दुबई : वृत्तसंस्था
दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
हैदराबादच्या 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. कारण दिल्लीला पृथ्वी शॉ याच्या रूपात पहिला धक्का बसला, पण त्यानंतर सलामीवीर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरला. धवन आणि श्रेयस यांनी दुसर्या विकेटसाठी 67 धावांची भागीदारी रचली. धवनने या वेळी 42 धावांची खेळी साकारली, तर श्रेयसने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद 47 धावांची खेळी साकारली, दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने या वेळी नाबाद 35 धावा करत श्रेयसला चांगली साथ दिली.
हैदराबादचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा तिसर्याच चेंडूवर बाद झाल्याचे पाहायला मिळाले, वॉर्नरला या वेळी भोपळाही फोडता आला नाही. पहिल्याच षटकात धक्का बसल्यावर वृद्धिमान साहा आणि कर्णधार केन विल्यम्सन यांनी सावध सुरुवात केली, पण या जोडीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने साहाला बाद केले आणि ही जोडी फोडली. साहाला या वेळी 18 धावांवर समाधान मानावे लागले. साहा बाद झाल्यावर संघाची जबाबदारी ही कर्णधार केनवर होती. केन या वेळी सावधपणे धावा वाढवण्याचा प्रयत्न करत होता, पण फिरकीपटू अक्षर पटेलने या वेळी केनला बाद केले आणि हैदराबादला मोठा धक्का दिला. केनला या वेळी 18 धावा करता आल्या. केन बाद झाला आणि हैदराबादचा डाव अडचणीत आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर अब्दुल समदने काही काळ धडाकेबाज फलंदाजी करत 28 धावा फटकावल्या आणि संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. त्याचबरोबर रशिद खाननेही अखेरच्या षटकात चांगली फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच हैदराबादच्या संघाला 134 धावा करता आल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper