नाशिक : प्रतिनिधी
राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य सरकारने नवी प्रभाग रचना जाहीर केली असून त्यानुसार तीन, दोन आणि एकसदस्यीय व्यवस्था असेल अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून आक्षेप घेतला जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर तोंडसुख घेतले आहे. राज ठाकरे सध्या नाशिक दौर्यावर असून तिथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी नव्या प्रभाग रचनेवर टीका केली. अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही अस्तित्वात नसताना महाराष्ट्रात हे कुठून आणि का सुरू झालं, याचं एकमेक कारण सत्ता काबीज करणं आहे, महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का, असं राज ठाकरे या वेळी म्हणाले.
याविषयी पाच वर्षांपूर्वीही मी बोललो होतो. 2012मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होते, तोपर्यंत एकाच उमेदवाराची व्यवस्था होती. तेव्हा त्यांनी दोन उमेदवारांच्या प्रभागाची रचना केली. त्यानंतर चार उमदवारांचा प्रभाग केला. आता ‘मविआ’ सरकारने आधी एक प्रभागाची रचना आणली. निवडणूक आयोगानेही एकाच उमेदवाराचा प्रभाग करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर काल यांनी पुन्हा तीन उमेदवारांचे प्रभाग आणले, असे राज ठाकरेंनी सांगितले.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार का? असा उलट सवाल देखील राज ठाकरेंनी या वेळी केला. मुळात अशी कोणतीही पद्धत देशात कुठेही नाही. सगळीकडे खासदारकी, आमदारकी, पालिका, ग्रामपंचायतीपर्यंत एकच उमेदवार हीच पद्धत आहे. महाराष्ट्रात हे कुठून सुरू झालं आणि का याचं एकमेव कारण म्हणजे सत्ता काबीज करणे आणि त्यातून आपापल्या पद्धतीने प्रभाग तयार करणे आणि पैसा ओतून निवडणूक जिंकणे. पण याचा त्रास लोकांना का? एका उमेदवाराला मत देण्याऐवजी तीन उमेदवारांना लोकांनी का मत द्यायचं? जनतेला गृहीत धरायचं, हव्या त्या पद्धतीने प्रभाग करायचे. निवडणूक आयोगाने यावर कारवाई करायला हवी. महाराष्ट्राचा कायदा देशापेक्षा वेगळा आहे का? हा कसला खेळ चालू आहे? उद्या तीन आमदार किंवा तीन खासदारांचा एक प्रभाग करणार आहात का? असे ते शेवटी म्हणाले.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper