Breaking News

वाहतूक कोंडीमुक्तीकडे पनवेलची वाटचाल

टपाल नाका ते उरण नाका एकदिशा मार्गाची काटेकोर अंमलबजावणी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील वाहतूक कोंडीसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेत नुकतीच पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, नगरसेवक आणि व्यापारी यांची बैठक घेतली. या वेळी सूचविण्यात आलेले उपाय प्रायोगिक तत्त्वावर काही दिवस राबविण्याचे ठरले. त्यानुसार त्या अनुषंगाने टपाल नाका ते उरण नाका हा मार्ग एकदिशा मार्ग ठरवण्यात आला आहे. तर उरणनाक्यापासून टपालनाक्याकडे येणार्‍या सर्व वाहनांना (दुचाकी वगळून) प्रवेश बंद करण्यात आला आहे.

उरण नाका ते टपाल नाका हे शहरातील बाजारपेठेचे ठिकाण आहे. या ठिकाणी 2003 साली तत्कालीन नवी मुंबई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी या मार्गावर एकदिशा मार्ग अंमलात आणण्याबाबत आदेश निर्गमित केले होते, मात्र अंमलबजावणी होताना दिसून येत नव्हती. याबाबत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्यासह स्थानिक नगरसेवक यांच्यात बैठक घेण्यात आली. या वेळी शहराचा सर्व्हे करण्यात आला असून, वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

उरण नाका ते टपाल नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने तक्रारी देखील वाढल्या होत्या. या अनुषंगाने वाहतुकीचे नियमन व सुसूत्रता आणण्यासाठी सोमवार (दि. 27)पासून अंमलबजावणी करण्यात आली. या वेळी शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश खांडेकर यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

अनेक दुकानांसमोरील रस्त्यावर टेम्पो, ट्रक्स व इतर अवजड वाहने उभी असल्याचे दिसून येते. तर काही ठिकाणी दुकानासमोर शिडी टाकून व्यापार्‍यांकडून पार्किंग अडवण्यात येते. त्यामुळे अशांवरदेखील कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सम-विषम पार्किंगचे उल्लंघन केल्यास कारवाई

दरम्यान, पंचरत्न सर्कल ते मोमीनपाडा मशीद मार्गे टपाल नाका या मार्गावर सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासाठी वाहतूक विभागाच्या टोईंग व्हॅन विभागालाही कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. या मार्गावरील दुकानदारांनाही सम-विषम वाहने पार्किंगबाबत सूचना देण्यात आल्या आहेत अन्यथा उल्लंघन केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी केले आहे.

उरण नाका ते टपाल नाका या ठिकाणच्या वापार्‍यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात आली आहे. व्यापार्‍यांनी देखील याबाबत काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. याबाबत व्यापार्‍यांना वाहतूक विभागामार्फत नोटीसदेखील दिल्या जाणार आहेत. व्यापार्‍यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे, मात्र त्यादृष्टीने अंमलबजावणी न झाल्यास कारवाईच्या अनुषंगाने पावले उचलली जातील.

संजय नाळे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक विभाग

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply