गरबा, भोंडल्यात महिला दंग
मुरूड : प्रतिनिधी
अश्विन शुद्ध पौर्णिमेला सर्वत्र कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. मंगळवारी (दि. 19) रात्री गरबा व भोंडला खेळून मुरुडमधील महिलांनी कोजागिरी साजरी केली.
लक्ष्मीदेवी कोजागिरीच्या रात्री कोण जागृत आहे, हे पाहते, अशी आख्यायिका आहे. लक्ष्मीच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी महिला रात्रभर विविध कार्यक्रम तसेच भोंडला खेळतात. मुरूडमध्ये मंगळवारी रात्री सीमा जनार्धन कंधारे यांनी भोंडल्याचे आयोजन केले होते. त्यात मुली व महिला कोरोनाविषयक नियम पाळून मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
हस्त नक्षत्राचे प्रतीक असलेल्या हत्तीची प्रतिमा मध्यभागी ठेऊन त्याभोवती महिलांनी फेर धरून विविध गाण्यांमधून लोकसंस्कृती व मनातील व्यथा मांडल्या या वेळी गरबा नृत्यही करण्यात आले. उपस्थित महिलांना खिरापत म्हणजेच भोंडल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला.
भोंडलाच्या विविध गाण्यांमधून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. नवीन पिढीला भारतीय संस्कृतीची ओळख राहावी, यासाठी भोंडला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
-स्नेहा उदय गद्रे, आयोजक, मुरूड