नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
आजपर्यंत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजकीय मुद्द्यांवर अनेक भाषणे आणि मुलाखती देताना पाहिले आहे, पण पहिल्यांदाच मोदींच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न अभिनेता अक्षय कुमारने केला आहे. अक्षयने मोदींची मुलाखत घेतली असून, यामध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील बर्याच छोट्या-मोठ्या गोष्टी उलगडून सांगितल्या आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोदींच्या खासगी आयुष्यातील बरीचशी माहिती पहिल्यांदाच समोर आली आहे. याच मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या उलटं घड्याळ घालण्याच्या सवयीबद्दलचे गुपित सांगितले.
अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशा प्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष कारण असल्याचे सांगितले. ‘मी अनेकदा बैठकांमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो. कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असे स्पष्टीकरण मोदींनी दिले.
या मुलाखतीत अक्षयने मोदींना त्यांच्या झोपेविषयी प्रश्न विचारला. ‘तुम्ही फक्त तीन ते चार तासच का झोपता?,’ असा प्रश्न त्याने विचारला. यावर मोदी म्हणाले, ‘मला अनेक जण हा प्रश्न विचारतात. इतकंच नव्हे तर अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीसुद्धा मला झोपेविषयी प्रश्न विचारला होता. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. एकमेकांशी एकेरी भाषेतच आम्ही बोलतो. इतके कमी तास झोपून तू स्वत:चं नुकसान करतोयस, असे ते म्हणायचे, पण माझ्या शरीराला तशी सवयच लागली आहे. तीन ते चार तासांत माझी झोप पूर्ण होते. इतकीच माझी झोप आहे आणि ही सवय मला खूप आधीपासून आहे.’ पंतप्रधान मोदींना राग येतो का, सोशल मीडियावरील मीम्सवर त्यांची प्रतिक्रिया काय असते, विरोधी पक्षांसोबत त्यांचे नाते कसे असते अशा विविध प्रश्नांवरही त्यांनी मनमोकळेपणाने या मुलाखतीत उत्तरे दिली.