Breaking News

डॉक्टरकडून बाळाची विक्री

कामोठ्यातील संतापजनक घटना

पनवेल : वार्ताहर

लहान बाळाची चार लाखांत विक्री करणार्‍या डॉक्टरला कामोठे पोलिसांनी शुक्रवारी (दि. 29) कामोठे वसाहतीमधून रंगेहात अटक केले आहे. त्यासोबत बाळाला विक्रीसाठी घेऊन आलेल्या महिलांनादेखील पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना कामोठे वसाहतीमधील असून डॉक्टरचे या वसाहतीमध्ये स्वतःचे क्लीनिक आहे.

डॉ. पंकज गोपालराव पाटील (वय 53 वर्ष राहणार कामोठे)हे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पंकज पाटील यांनी स्त्री जातीच्या लहान बाळाचा सौदा करून चार लाखाला त्याची विक्री केली होती. सध्या हा डॉक्टर कामोठे पोलिसांच्या ताब्यात आहे. कामोठे सेक्टर 8 मधील फॅमेली हेल्थ केअर नावाने दवाखाना चकवणारा डॉक्टर एका लहान बाळाची चार लाखाला विक्री करणार असल्याची माहिती, कामोठे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाला यांना मिळाली होती. त्यानुसार, महाला यांनी या डॉक्टरला अटक करण्यासाठी सापळा रचून पोलीस नाईक मंथन पाटील यांच्या मदतीने खाजगी पंच आणि खबर देणारा व्यक्ती बाळाची खरेदी करण्यासाठी स्वतः पंकज पाटील यांच्या दवाखान्यात गेल्या.

या वेळी डॉक्टर पाटील यांनी सांगितलेल्या चार लाखाची रक्कमदेखील सोबत घेऊन गेल्या. या चार लाखात पोलिसांनी काही बनावट नोटा लावून चार लाखाची रक्कम जमा करून ते सोबत गेले. या वेळी डॉक्टरसोबत जाऊन पैसे दाखवून बाळाची विचारणा केली, त्या वेळेस डॉक्टरने रक्कम पाहून बाळाला विकणार्‍या महिलेला फोन केला आणि क्लीनिकमध्ये येण्यास सांगितले. त्या नुसार तळोजामध्ये राहणार्‍या तीन महिला अवघ्या 10 मिनिटात स्त्री जातीच्या लहान बाळाला घेऊन त्या क्लीनिकमध्ये आल्या आणि ठरलेल्या व्यवहारानुसार डॉ. पंकज पाटील यांनी पैसे घेतले  आणि बाळा त्याच्या स्वाधीन केले.

या वेळी विक्रीसाठी आलेल्या महिला बाळाला देऊन बाहेर पडल्या. त्याचवेळी क्लीनिक च्या बाहेर दबा धरून बसलेल्या पोलीस निरीक्षक महाला यांच्या पथकांने महिलांना व डॉक्टरला अटक केली. डॉक्टरने घेतलेली रक्कमदेखील ताब्यात घेण्यात आली. या प्रकरणामुळे डॉक्टर वर्गात खळबळ माजली आहे. सध्या कामोठे पोलीस या घटनेचा तपास करत असून, डॉक्टरकडून अधिक माहिती गोळा करीत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply