पनवेल ः रामप्रहर वृत्त
एसटी कर्मचारी त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. त्यामुळे जोपर्यंत या कर्मचार्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही भाजप कामगार आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रीती व्हिक्टर यांनी शुक्रवारी (दि. 12) येथे दिली. पनवेल आगारात सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाला डॉ. व्हिक्टर यांनी भेट देत भाजप कामगार आघाडीच्या वतीने पाठींबा जाहीर केला तसेच कर्मचार्यांसोबत चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकले. भाजप कामगार आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र घरत सोबत होते. एसटी कर्मचार्यांचा विलगीकरणासाठीचा लढा सुरूच आहे. या लढ्यात सहभागी होत पनवेल आगारातील कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाहीत तोपर्यंत हा संप चालू राहणार असल्याची भूमिका एसटी कर्मचार्यांनी घेतली आहे. या आंदोलनाला भाजप कामगार आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी आलेल्या प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रीती व्हिक्टर यांनी पनवेल आगारात कर्मचार्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या वेळी डॉ. व्हिक्टर म्हणाल्या की, एसटी कर्मचार्यांवर अन्याय होत आहे. शासनाचे सर्व नियमव दंड कर्मचार्यांना लागू होतात, मात्र त्यांचे अधिकार त्यांना मिळत नाही. त्यामुळे या कर्मचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप कामगार आघाडी त्यांच्या सदैव पाठीशी आहे व असेल. राज्य सरकारने एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. या वेळी भाजप कामगार आघाडीचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर साखरे, उपाध्यक्ष अरुण घोडके, रवींद्र कोरडे, जगदिश म्हात्रे, रवी नाईक, निलेश पिंपळकर, भाजप चित्रपट कामगार आघाडी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष डॉ. नेत्रा राणे, मंगेश पाटील, पीयूष ठाकूर आदी उपस्थित होते.