
वाराणसी : वृत्तसंस्था
भारत स्वतंत्र झाल्यापासून पहिल्यांदाच सत्ताधार्यांच्या बाजूने लाट आहे. पूर्वी कायम सत्ताविरोधी लाट असे, पण यंदा लोक सत्ताधार्यांच्या बाजूने आहेत, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. ते वाराणसीत स्थानिक भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.
लोकसभा निवडणुकीत वाराणसीमध्ये सातव्या टप्प्यात म्हणजेच 19 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी
(दि. 26) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी, त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. ‘आजपर्यंत कायम सत्ताधार्यांच्या विरोधात लाट होती. या वेळी मात्र सत्ताधार्यांच्या बाजूने लाट असणार आहे. या लाटेमुळे देशातील सगळे राजकीय विश्लेषक आश्चर्यचकित होतील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, वाराणसीतील प्रत्येक मतदान केंद्रावर आपल्यालाच बहुमत मिळायला हवे. एकाही मतदान केंद्रावर जर बहुमत मिळाले नाही, तर मला वाईट वाटेल. मला प्रत्येक मतदान केंद्र जिंकायचे आहे. विरोधकांनी कितीही अपप्रचार केला, मला कितीही शिव्या दिल्या, तरी भाजप कार्यकर्त्यांनी आपली पातळी सोडू नये. राजकारणात अलीकडे प्रेम संपत चालले आहे, पण विरोधी पक्षांबद्दल आपल्या मनात प्रेमाची भावना असायला हवी. द्वेषाची नाही, असेही ते म्हणाले.
महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या टक्केवारीहून अधिक असावा, अशी इच्छा व्यक्त करून पंतप्रधान मोदी म्हणाले की, पहिल्यांदा मतदान करणार्या तरुणांची यादी तयार करा. ते कोणत्या विचारधारेचे आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका. त्या सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करा.
एनडीएच्या एकजुटीचे दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यात शिरोमणी अकाली दलचे प्रमुख व पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल, जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, एआयडीएमके नेते पनीर सेल्वम, एम. थंबीदुराई, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, एलजेपी नेते रामविलास पासवान आदी नेत्यांचा समावेश होता; तर भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी, पीयूष गोयल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी बादल यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले.