अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील महाजने येथील दिवीवाडीमधील आदिवासी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची वाडी अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व शिक्षक संदीप वारगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत दिवीवाडीमधील प्रत्येक घराच्या भिंतीला गणित, उजळणी, इंग्रजी शब्दांचे फलक लावण्यात आलेत. त्यामुळे खेळता खेळता मुलांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत. या उपक्रमातून मुलांची बौद्धीक क्षमता वाढीबरोबरच त्यांचे पाठांतरही सहज होण्यास मदत होणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनमुळे शाळा बंद होत्या. आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी विद्यार्थ्यांना घराबाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे शैक्षणिक नुकसानाबरोबरच मुलांच्या सर्वांगीण विकासालासुध्दा मर्यादा येत होत्या. त्यातून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइन शिक्षण पद्धती स्वीकारली गेली. ऑफलाइन आणि ऑनलाइन शिक्षण पद्धतीने अध्ययन अध्यापन सुरू झाले. तरीही अनेक अडचणी जाणवत होत्या. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भाषिक मूलभूत अध्ययन कौशल्य व गणिती संबोध यावर परिणाम घडून आलेला दिसत होता. आदिवासी दुर्गम भागात स्मार्ट मोबाइल आणि इंटरनेटची अपुरी सुविधा होती.
1 डिसेंबरपासून शाळा सुरू झाल्या, मात्र विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्तरामध्ये उणिवा दिसून आल्या. जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन प्रयोग व उपक्रमांना चालना देण्यासाठी गुणवत्ता विकास कक्ष सुरू केले. तालुकानिहाय उपक्रमशील शिक्षक निवडून त्याद्वारे विविध कार्यक्रमांची आखणी सुरू केली आहे. उपक्रमशील, तंत्रस्नेही व आदर्श शिक्षक संदीप वारगे यांची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करून जिल्हा व तालुका स्तरावर टास्कफोर्स तयार केले. या उपक्रमांचा भाग म्हणून जिल्हा समन्वयक वारगे यांनी स्वतःच्या शाळेपासून सुरुवात करीत शिक्षणाची वाडी-दिवीवाडी हा नाविन्य उपक्रम हाती घेतला आहे. मराठी, इंग्रजी व गणित विषयांवर आधारित मूलभूत कौशल्य व संबोध समृद्धी वाढविण्यावर उपक्रमाच्या माध्यमातून भर देण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper