खारघर : रामप्रहर वृत्त
खारघरमधील रस्ते आणि पदपथांच्या समस्या सोडविण्यासाठी खारघर भाजप शिष्टमंडळाच्या वतीने बुधवारी (दि. 29) प्रभाग अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली तसेच या समस्येवर उपायायोजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. दिवसेंदिवस खारघरमधील सर्व सेक्टर्समधील रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांनी व्याप्त झालेले आहेत. नागरिकांना रस्त्यावर चालणे मुश्कील होत असते शिवाय याचा परिणाम रहदारीला सुद्धा होत असतो, या संदर्भात खारघरच्या नगरसेवकांनी वेळोवेळी महानगरपालिकेला निवेदने दिलेली होती. तेवढ्यापुरता कारवाई झाल्यानंतर पुन्हा फेरीवाले रस्ते व पदपथावर आपली दुकाने थाटून बसतात. या मुद्द्यावर बुधवारी खारघर भाजपचे शिष्टमंडळाने पनवेल महानगरपालिका प्रभाग ‘अ’चे अधिकारी जितेंद्र मढवी यांची भेट घेतली. या विषयावर विविध मुद्द्यांवर चर्चा करताना प्रभाग अधिकारी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला मार्शल व नवीन अतिक्रमणाच्या गाड्या सोबत अनधिकृतपणे रस्त्यावर व पदपथावर बसण्यार्या फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. या वेळी प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता वासुदेव पाटील, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरीश केणी, अभिमन्यू पाटील, निलेश बाविस्कर, नगरसेविका संजना कदम, आरती नवघरे, नेत्रा पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, समीर कदम, पाटील उपस्थित होते. पनवेल पालिकेच्या वतीने प्रभाग समिती ‘अ’चे अधिकारी जितेंद्र मढवी, स्वच्छता निरीक्षक संदीप भोईर, कुणाल गायकवाड, अतुल मोहोकर, अजय ठाकूर उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper