Breaking News

‘मातृभाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करावा’

रोहे : प्रतिनिधी

मानवाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दांची व वाणीची आवश्यकता भासते. म्हणून प्रत्येकाने आपली मातृभाषा टिकवण्यासाठी व तिचा जास्तीत जास्त वापर करण्याचा मनापासून प्रयत्न केला पाहिजे, असे प्रतिपादन रोहा तहसीलदार कविता जाधव यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी गठीत केलेल्या रायगड जिल्हा मराठी भाषा समितीच्या माध्यमातून 14 ते 28 जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने  रोहा तहसील कार्यालयात घेतलेल्या कार्यक्रमात तहसीलदार जाधव बोलत होत्या. मानवी जीवनात मातृभाषेला खूप महत्त्व असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे व पूजन करण्यात आले. या  वेळी रोह्याचे सुपुत्र डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा भाषा समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रोह्याचे मकरंद प्र. बारटके यांचा या वेळी तहसीलदार कविता जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हभप नारायण महाराज दहिंबेकर आणि मकरंद बारटके यांनी गीता किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे महत्त्व विषद केले. शेवटी पसायदानाचे सामूहिक पारायण झाले. नायब तहसिलदार राजेश थोरे, मानसी साठे, सुखद राणे यांच्यासह वारकरी संप्रदायाचे अनुयायी व तहसील कार्यालयातील कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply