Breaking News

प्रो लीग हॉकी : भारताकडून दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा

केपटाऊन ः वृत्तसंस्था

अनुभवी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगने साकारलेल्या गोलचौकाराच्या बळावर भारताने पुरुषांच्या प्रो लीग हॉकीमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा धुव्वा उडवला. भारताचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय ठरला आहे. टोक्यो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या भारताने गेल्या आठवडयात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीतही आफ्रिकेवर 10-2 असे वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे दुसर्‍या सामन्यासाठीही भारताचे पारडे जड मानले जात होते. त्यातच शनिवारी फ्रान्सकडून 2-5 असा पराभव पत्करल्याने भारतीय हॉकीपटूंवर कामगिरी उंचावण्याचे दडपण होते. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारतासाठी हरमनप्रीतने अनुक्रमे 13, 52व्या मिनिटाला पहिले दोन, तर 60व्या मिनिटात आणखी दोन गोल नोंदवले. शिलानंद लाक्राने (27वे, 48वे मि.) दोन गोल झळकावत हरमनप्रीतला उत्तम साथ दिली. याव्यतिरिक्त सुरेंदर कुमार (15वे मि.), मंदीप सिंग (28वे मि.), सुमित (45वे मि.) आणि शमशेर सिंग (56वे मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला. आफ्रिके कडून डॅनियल बेल (12वे मि.) आणि कोनोर ब्यूचॅम्प (53वे मि.) यांनी दोन गोल नोंदवले. या विजयासह भारतीय संघाने गुणतालिकेतील तिसरे स्थान भक्कम केले असून चार सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात तीन विजयांचे नऊ गुण जमा आहेत. नेदरलँड्स (16 गुण) आणि बेल्जियम (10 गुण) पहिल्या दोन क्रमांकावर विराजमान आहेत.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply