भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समिती अंतर्गत येणार्या गव्हाण गणातून शिवसेनेच्या उमेदवार सोनल मनोज घरत यांनी महायुतीचा धर्म पाळत आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भाजप महायुतीच्या उमेदवार जिज्ञासा किशोर कोळी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील महायुती सरकारची एकजूट, शिस्त आणि समन्वय कायम ठेवण्याच्या दृष्टीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे तसेच आमदार महेंद्र थोरवे यांच्या सूचनेनुसार सोनल घरत यांनी हा निर्णय घेतला. महायुती अधिक बळकट करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर विकासाला प्राधान्य देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यासाठी सोनल घरत यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांची सदिच्छा भेट घेतली.
या वेळी मनोज घरत, भाजपचे विभागीय अध्यक्ष विजय घरत, उलवे शिवसेनाप्रमुख संदीप वायंगणकर, उपशाखाप्रमुख उदय रेणके, उपशहरप्रमुख अंकुश राठोड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून विजयासाठी पूर्ण ताकद लावण्याचा निर्धार व्यक्त केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper