Breaking News

कर्जत रेल्वेस्थानकातील शेडचे काम पूर्ण

ऊन-पावसापासून प्रवाशांचा बचाव

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवरील कल्याण दिशेकडील सुरू असलेले शेडचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. यासाठी पाठपुरावा करणार्‍या पंकज ओसवाल यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आणि कर्जतकर प्रवाशांची उन्हाळा व पावसाळ्यातील त्रासातून सुटका झाली आहे.

कर्जत रेल्वेस्थानकावर शेडचे काम कित्येक दिवसांपासून सुरू होते. ते कधी पूर्ण होईल याबाबत प्रवासीवर्गात चर्चा सुरू होती. हे काम खूपच मंदगतीने सुरू असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत होते. याबाबत कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे कर्जत रेल्वेस्थानकातील क्रमांक एकवरील शेडचे काम केव्हा पूर्ण होईल याबद्दल विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाने हे काम मार्च 2020 अखेर पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे कळविले होते. त्या वेळीही काम पूर्ण झाले नाही.

ओसवाल यांनी पुन्हा रेल्वे प्रशासनास कामाच्या निविदेप्रमाणे काम केव्हा पूर्ण झाले पाहिजे होते व हे काम निविदेमध्ये ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत पूर्ण होत नसेल, तर याबाबत कामास उशीर का होत आहे याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. याबाबत रेल्वे प्रशासनाने ओसवाल यांना उत्तर देताना असे कळविले आहे की, कर्जत रेल्वेस्थानकातील शेडचे काम हे कामासाठी काढलेल्या निविदेप्रमाणे 13 ऑगस्ट 2019पर्यंत पूर्ण झाले पाहिजे होते, तसेच मध्यंतरी जोरदार पाऊस झाल्यामुळे व त्या जागेमध्ये पाणी साचल्यामुळे कामासाठी विलंब झाला. रेल्वे प्रशासनाने असेही काळविले आहे की, या कामासाठी जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे काम केले जाणार आहे. 

याबाबत ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. त्या वेळी हे काम मार्च 2021पर्यंत पूर्ण होईल, असे कळविले होते. मार्च 2021 संपत आला तरी कामाबाबत काहीच हालचाल दिसत नव्हती. तरीही ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच ठेवल्याने हे काम 5 एप्रिलला सुरू होऊन मे 2021ला पूर्ण होईल, असे कळविण्यात आले. त्यानुसार शेडचे काम पूर्ण झाल्याने कर्जतकर प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

कर्जत रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक एकवरील शेडचे काम पूर्ण झाल्याने कर्जतकरांना आता उन्हाळा व पावसाळ्यापासून होणार्‍या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे. त्याबद्दल रेल्वे प्रशासनाला धन्यवाद

-पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते, कर्जत

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply