Breaking News

आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्यास जन्मठेप

माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल

म्हसळा : प्रतिनिधी

आंब्याच्या बागेमध्ये राखणदारीचे काम करणार्‍या दोन आदिवासी महिलांवर बलात्कार करणार्‍या मुन्ना पठाण याला माणगाव येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाण (रा. पाभरे) याच्या आंब्याच्या बागेमध्ये पीडित फिर्यादी व तिची बहीण या आदिवासी समाजाच्या महिला राखणदारीच्या कामावर होत्या. युनूस पठाणने  फिर्यादीला मारहाण करून तिच्या मुलाला व आजीला मारून टाकण्याची धमकी दिली व जबरदस्तीने डिसेंबर 2015 ते 3 डिसेंबर 2017 यादरम्यान वेळोवेळी पाभरे तांबडी, घोणसे म्हशाचीवाडी येथे तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

त्यातून ती गरोदर राहिली असताना तिचा गर्भपात घडवून आणला. तसेच त्याने फिर्यादीच्या लहान बहिणीवरही लैंगिक अत्याचार केले. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी युनूस उर्फ मुन्ना अब्दुल अजीज पठाणविरोधात म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करून श्रीवर्धन उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव पवार यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी माणगाव येथील विशेष सत्र न्यायालयासमोर झाली. सहाय्यक सरकारी वकील योगेश तेंडुलकर व शासकीय अभियोक्ता जे. डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने साक्षीदार तपासले. पीडित मुली व वैद्यकीय अधिकार्‍यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

माणगाव येथील विशेष सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी घटनेतील गुन्ह्याच्या शाबितीनंतर आरोपी युनूसला दोषी ठरवून शुक्रवारी (दि. 30) 14 वर्षे सक्तमजुरी व एक लाखाचा दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी तसेच अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट 3(2) (5) अन्वये जन्मठेप व 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply