महाप्रबंधक धरमवीर मीना यांचे आश्वासन
मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल, उरणमधील रेल्वेशी संबंधित समस्या 31 जानेवारी 2025पर्यंत मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी भाजपच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधानसभा निवडणुकीत उरण येथील सभेत पनवेल, उरणमधील रेल्वेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी महाप्रबंधक धरमवीर मीना यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचा शब्द दिला होता. दिलेला शब्द रेल्वेमंत्र्यांनी पूर्ण केला असून त्यांच्या आदेशानुसार भाजप शिष्टमंडळाची मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाप्रबंधकांसोबत सोमवारी (दि. 23) बैठक झाली. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रेल्वेशी निगडीत विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
आमदार प्रशांत ठाकूर स्थानिक कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी पनवेलमधील समस्या निवेदनामार्फत महाप्रबंधकांकडे पोहचवल्या. यामध्ये पनवेल रेल्वेस्थानकावरील सर्व फलाटांवर सकरते जिने (एक्सलेटर) बसवावेत, फलाट क्रमांक 1 ते 4मधील भुयारी मार्ग पनवेल पूर्वेपर्यंत वाढवावा, सध्या अस्तित्वात असलेला फूट ओव्हर ब्रिज प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यासाठी पुरेसा नाही; त्यामुळे नवीन रूंद फूट ओव्हर ब्रिजची गरज आहे; अपंग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिला यांच्यासाठी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर लिफ्टची आवश्यकता आहे तसेच वाढती वाहने लक्षात घेऊन स्थानकाबाहेर पार्किंगची पुरेशी व्यवस्था करावी, अशा मागण्या आहेत.
आमदार महेश बालदी यांनी उरणकरांसाठी सकाळी 5 ते रात्री 12 वाजेपर्यंत रेल्वे चालू करणे, दर अर्ध्या तासाने रेल्वे फेर्या वाढवणे, उरण ते सीएसएमटी रेल्वे सुरू करणे, स्थानकाबाहेर टू व्हीलर पार्किंग सेवा मोफत करणे, अशा मागण्या केल्या. महाप्रबंधक धरमवीर मीना यांनी पनवेल, उरणमधील रेल्वेसंबंधित समस्या व मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून येत्या जानेवारी अखेरीस सोडवण्याचे आश्वासित केले.
या बैठकीस भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शाह, गव्हाण जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे, उलवे नोड अध्यक्ष निलेश खारकर, युवा नेते वितेश म्हात्रे, नामदेव ठाकूर आदी उपस्थित होते.