नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकीत भारताला रौप्य पदक मिळवून देणारी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक हिला खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दीपाचा गौरव करण्यात आला आहे. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा पैलवान बजरंग पुनियालाही हा पुरस्कार देण्यात आला आहे. मात्र भारताबाहेर असल्याने हा पुरस्कार घेण्यासाठी तो उपस्थित राहू शकला नाही.
राष्ट्रपती भवनात रंगलेल्या शानदार सोहळ्यात दीपाला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजीजू आणि आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सायना नेहवाल आणि लक्ष्य सेनसारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे विमल कुमार यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी टेबल टेनिस कोच संदीप गुप्ता, राबीर सिंह खोकर (कबड्डी), मेजबान पटेल (हॉकी) आणि संजय भारद्वाज (क्रिकेट) यांनाही द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.
तर जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत ब्राँझ पदक मिळविणारे बी. साई प्रणित, स्वप्ना बर्मन (हेप्टॅथलॉन), एस. भास्करन (बॉडी बिल्डिंग), सोनिया (बॉक्सिंग), पूनम यादव (क्रिकेट), रेसलर पूजा ढांडा, प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), हरमीत देसाई (टेबल टेनिस) आणि फवाद मिर्जा यांना अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
ध्यानचंद अवॉर्ड मॅन्यूअल फेड्रिक्स (हॉकी), अरूप बसक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितेन किर्रताने (टेनिस) आणि लालरेमसानगा (तिरंदाजी) यांना देण्यात आला. अर्जुन पुरस्कारांचेही यावेळी वितरण करण्यात आले.