Breaking News

विरोधकांच्या दिशाभुलीला जनता बळी पडणार नाही -आमदार महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त
निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याची व विकासाची स्पर्धा करणे आवश्यक असते, मात्र जेव्हा विकासाची स्पर्धा करता येत नाही तेव्हा विरोधक जात, धर्म, भाषा, पंथाचा आधार घेतात. केवळ राजकीय हेतुपुरस्सर जातीची ढाल पुढे करून विरोधक दिशाभूल करीत असले तरी जनता बळी पडणार नाही, असा विश्वास महायुतीचे उमेदवार व उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्र पक्ष महायुतीचे आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सहकार व नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची जाहीर सभा 15 नोव्हेंबर रोजी पनवेलजवळील करंजाडे येथे होणार आहे. तत्पूर्वी 9 नोव्हेंबर रोजी उलवे नोड व 10 नोव्हेंबरला मोहोपाडा येथे सभा होईल, तर 17 नोव्हेंबरला उरण येथे सभा होणार आहे.
सर्वत्र प्रचाराची धूम सुरू असून हजारोंच्या संख्येने उपस्थित असणारी कार्यकर्त्यांची संख्या विरोधकांना पाहवत नाही. त्यामुळे बुडत्याला काडीचा आधार मिळवण्यासाठी केवळ जातीपातीच्या राजकारणाचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याची टीका आमदार महेश बालदी यांनी केली.
माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे विकासाचा अजेंडा नाही. ते फक्त जात, धर्म, भाषा, पंथ एवढेच मुद्दे पुढे करतात. हा मारवाडी आहे का? आमच्या जातीचा आहे का? असे म्हणून ते माझी जात काढतात, मात्र 21व्या शतकात लोकांना विकास आवडतो. आपल्याकडे व्हिजनरी नेता असावा हा सर्वसामान्य मतदारांचा विचार असतो. त्यामुळे लोक मला विकासाच्या दृष्टीने निवडून देतील, असा विश्वासही महेश बालदी यांनी व्यक्त केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply