Breaking News

पाऊस थांबल्याने म्हसळ्यात गौरीपूजन उत्साहात

म्हसळा : प्रतिनिधी

तालुक्यात शुक्रवारी गौरींचे माहेरवाशिणीसारखे स्वागत करण्यात आले. सकाळच्या सत्रात पावसाने उघडीप घेतल्याने  विशेषत: म्हसळा तालुक्यातील खारगाव (बु), तोंडसुरे, खारगाव (खु), आगरवाडा, बनोटी, गणेशनगर, खरसई, मेंदडी, मेंदडी कोंड, वारळ, काळसुरी, गोंडघर या आगरी वस्तीच्या गावांतील  माहेरवाशिणींत या वेळी नेहमीपेक्षा जास्त उत्साह होता. ज्येष्ठगौरी अनुराधा नक्षत्रात येतात. ज्येष्ठा नक्षत्रात त्यांचे पूजन केले जाते. मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. गणेशोत्सवानिमित्ताने कुटुंबातील सगळे जण एकत्र येतात. त्यावेळी आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून राहणार्‍या या गौरींसाठी छानशी सजावटही केली जाते. यामध्ये फुलांनी, घरातील स्त्रियांनी केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंनी किंवा बाजारात तयार मिळणारे सजावटीचे सामान वापरून सजावट केली जाते. गौरीच्या मुखवट्यांमध्येही शाडू, कापड, कागद, फायबर असे बरेच प्रकार पाहायला मिळतात. काहींकडे केवळ मुखवट्यांची पूजा होते, तर काहींकडे पूर्ण उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी असते. ब्राह्मण समाजात समुद्रातील किंवा नदीतील खडा आणून त्या पूजण्याची रित आहे,  तर काही जणांकडे तांब्यावर चेहरा रेखाटून गौरींचे पूजन केले जाते. पहिल्या दिवशी गौरीला भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यांना नवीन वस्त्र, दागदागिने घालून सजविले जाते. गौरीला सूप ओवाळण्याचीही प्रथा आहे. नव्या सुपात चोळी, खण वगैरे पूजा द्रव्ये, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारचे घरात केले जाणारे पदार्थ ठेवून नववधू ते भरलेले सूप गौरीसमोर वरून खाली पाच वेळा करते. याला सूप ओवसणे (ओवाळणे) म्हणतात.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply