
कर्जत : प्रतिनिधी
गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दोन-तीन दिवसांनी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी फुलांच्या तर काही ठिकाणी मूर्तीच्या गौरींचे पूजन करण्यात येते. त्यानंतर घरातील व शेजारील सुवासिनी गौरीचा ओवसा घेतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. यंदा कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1345, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1252, माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत 11 अशा एकूण 2609 गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गौरींचे आगमन एकाच वेळी होते. कुणी मूर्तीची गौर पूजतात तर कुणी पहाटेच रानात जाऊन गौरी पूजनाच्या पूर्वसंध्येपर्यंत कचोर्याची फुले (गौरीची फुले) व तेरड्याच्या फुलांसकटच्या फांद्या आणतात. त्यानंतर महिला रात्रभर गाणी गात गौर सजवून त्यावर मुखवटा आणि पुठ्ठ्याचे हात लावून खुर्चीवर गौर बसवितात. कुणाच्या उभ्या गौरी तर कुणाच्या नाचर्या गौरी असतात. त्यांचे पूजन मात्र सारख्याच पद्धतीचे असते. दुपारी गौरीचे पूजन झाल्यावर घरातील सुवासिनी नटूनथटून सुपामध्ये पूजेचे साहित्य घेऊन गौरीचा ओवसा घेतात. नववधूने हा ओवसा घेतलाच पाहिजे असे परंपरेनुसार ठरलेले आहे. या वेळी उकडलेल्या पिठांचे दिवे लावून गौरींना ओवाळले जाते. गौर आणली जात नाही. काहींची गौर एकच असते. अशा ठिकाणी सारे कुटुंबीय गौराई असलेल्या मोठ्या घरी एकत्रित होतात आणि गौरी पूजनाचा आनंद लुटतात.
RamPrahar – The Panvel Daily Paper