Breaking News

वृद्धेच्या खूनप्रकरणी कुबेर पांडेला अटक

अलिबाग : प्रतिनिधी

ऐन गणेशोत्सवात अलिबाग तालुक्यातील आवास गावात एका वृद्ध महिलेचा खून झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणात कुबेर उर्फ मोबाइल अजोरा पांडे (40) या आरोपीला अटक केली आहे.

आवास गावात राहणार्‍या प्रभावती सीताराम म्हात्रे (86) या महिलेचा 30 ऑगस्ट रोजी गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. अज्ञाताने त्यांच्या अंगावरील सोनसाखळी, कर्णफुले असा सोन्याचा ऐवज ओरबाडून नेला होता. या चोरी आणि हत्येप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांनी घटनास्थळी भेट देऊन या गुन्ह्याचा तत्काळ तपास करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिल्या होत्या.  गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक जे. ए. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदार शेवते, हंबीर, पाटील, पिंपळे, पोलीस नाईक कराळे, सावंत, शेलार, येरूणकर आणि त्यांच्या पथकाने खात्रीशीर माहितीवरून मकाविक्रीचा व्यवसाय करणार्‍या कुबेर उर्फ मोबाइल अजोरा पांडे याला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले. कुबेर पांडे हा गेल्या 15 वर्षांपासून आवास परिसरात राहत होता. तो हातगाडीवर मकाविक्रीचा व्यवसाय करीत असे. घटना घडल्यापासून तो गायब होता. त्यामुळे त्याच्यावरचा संशय बळावला होता. अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देताना प्रभावती म्हात्रे या वृद्धेचा टॉवेलने गळा आवळल्याचे सांगितले. घटनेनंतर अवघ्या 48 तासांतच पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply