श्रेय लाटण्यासाठी शेकापकडून आंदोलनाची नौटंकी
रसायनी ः रामप्रहर वृत्त
दयनीय अवस्था झालेल्या कोन-सावळा रस्त्यावरील खड्डे भरण्यास आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेली आहे, मात्र याचे श्रेय त्यांना मिळेल या भीतीने पछाडलेल्या शेतकरी कामगार पक्षाने शनिवारी (दि. 30) आंदोलनाची नौटंकी केली.
कोन-सावळा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याकरिता उरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नाने सार्वजनिक विभागाकडून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून एक महिन्याच्या आत काम सुरू होणार आहे.
याशिवाय कोन-सावळा रस्त्याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत 15 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या कामाची तांत्रिक मान्यता झाली असून दोन महिन्यांच्या आत काम सुरू होणार आहे.
वास्तविक कोन-सावळा रस्त्याकरिता प्रस्तावित कामांना महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे एक-दोन महिने उशीर होणार असल्याने आमदार महेश बालदी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने खड्डे भरण्यास सांगितले व त्यानुसार या कामास सुरुवातदेखील झालेली आहे. त्यानंतर जाग आलेल्या शेकापने शनिवारी आंदोलनाचा स्टंट केला.
खरेतर शेकाप म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा एक भाग आहे. मग त्यांनी या रस्त्यासाठी का निधी मंजूर करून घेतला नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे शेकापला जर आंदोलन करायचेच असेल तर त्यांनी आधी कर्नाळा बँक खातेदारांची समस्या सोडवण्यासाठी करावे, अशी भावना जनमानसात आहे.
उरण विधानसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्यासाठी आमदार महेश बालदी खंबीर आहेत. त्यांच्याच प्रयत्न व पाठपुराव्यातून कोन-सावळा रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम लवकरच सुरू होऊन पूर्ण होईल, असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये आहे.