Breaking News

विद्यार्थ्यांनी ज्ञान विस्तृत करून कार्यरत राहिले पाहिजे -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात सोमवारी (दि. 10) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभास सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मराठी माणसाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता उद्योजक बनून इतरांना नोकरी दिली पाहिजे. नोकरी मागणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बना, असा मोलाचा संदेश दिला. ते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान विस्तृत करून काम करीत राहिले पाहिजे. मग तुम्हाला एक दिवस नक्कीच मानाचे स्थान मिळेल. कष्टाने व मेहनतीने माणूस मोठा होतो. त्यासाठी कोणतेही काम कमी न लेखता कामाची कास धरावयास हवी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले की, आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. दळणवळणाची साधने प्रगत झाली आहेत. संपूर्ण जग जवळ आले आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी केवळ देशाचे नाही तर जगाचे नागरिक बनणे आवश्यक आहे. संगणक क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेचे ज्ञान, संगणक ज्ञान व एआय, चॅट जीपीटीसारख्या प्रणालीचे सखोल ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे.
कुलगुरू पुढे म्हणाले की, आज विद्यार्थ्यांना नव्हे; तर सर्व नागरिकांना तीन ‘टी’चे ज्ञान असणे आवश्यक आहे ते म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी व बायोटेक्नॉलॉजी. त्यामुळे व्यक्ती प्रगत, जलद व आरोग्यदायी जीवन जगू शकेल. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या भित्तिपत्रिकाचे उल्लेख करीत त्यांच्या आवडी निवडीचे विशेष कौतुक केले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत महाविद्यालयाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला, तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व कार्यक्रमाचे कार्यवाह डॉ. राजाराम पाटील यांनी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाचा अहवाल सादर केला.
कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. विजय कुंभार, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डी.बी. पाटील, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, पनवेलच्या तहसीलदार अरुणा राठोड, विजय लोखंडे, सिप्ला कंपनीच्या उल्का धुरी तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. नामदेव पवार, रजिस्ट्रार अनंता जाधव, विद्यार्थी परिषद अध्यक्ष अरहंत कुशलवर्धन, सचिव सोनाली नाईक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रफुल्ल वशेणीकर, डॉ. यशवंत उलवेकर, प्रवीण गायकर व प्रा. शरयू नाईक यांनी केले, तर उपस्थितांचे आभार विद्यार्थी परिषद अध्यक्ष अरहंत कुशलवर्धन यांनी मानले.

Check Also

लक्षवेधी मराठी सिनेतारका

मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक नायिका लक्षवेधक ठरल्या. त्यातीलच काही नायिकावर हा 8 मार्च या महिला …

Leave a Reply