लोकसभा निवडणूककामी व्यग्र असलेल्या प्रशासनाला आचारसंहितेत नैसर्गिक आपत्तीला प्राधान्य देण्यासंदर्भातील गांभिर्य दिसून येत नसल्याचे तालुक्यातील लोहारमाळ येथे कोकणातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचलेल्या तापमानवाढीनंतर पोलादपूरवासियांना समजून आले आहे. अशा या तापमानवाढीच्या काळामध्ये पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईनेदेखील ग्रामीण भागातील पोलादपूरकरांचे आयुष्य पाण्यासाठी दाहिदिशा अशाप्रकारे वणवण फिरण्यास भाग पाडीत सैरावैरा केल्याचे दिसून येत आहे. कागदोपत्री पाणीटंचाई निवारण आराखडा प्रत्यक्षात किती सत्यात राबविला जातो, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना आवाज उठविण्यास निवडणूक आदर्श आचारसंहिता मौन बाळगण्यास भाग पाडीत आहे.
कालवली-धारवली आणि देवळे लघुपाटबंधारे धरणप्रकल्प पूर्णत: अपयशी झाले असताना नद्यांतील गाळउपसा करण्याकामी तसेच सीसीटी समतल चर खणण्याकामी महाराष्ट्र रोजगार हमी योजनांद्वारे होणारे दूर्लक्ष यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्याची चिन्ह दिसून येत नाहीत. पोलादपूरनजिकचे रानबाजिरे येथील महाड एमआयडीसीचे धरण उन्हाळयातही तुडूंब भरलेले दिसून येत असताना स्वाभाविकत: या परिसरातील बोअरवेल यशस्वी झालेल्या मोठया संख्येने दिसून येत आहेत. कापडे बुद्रुक आणि पोलादपूर येथील विस्तारित नळपाणीपुरवठा योजना भारत निर्माण मधून होऊ घातल्या असताना खरे तर अटी आणि शर्तीनुसार अशा बोअरवेल करण्यास ग्रामपंचायतीची ना हरकत मिळणे नियमबाह्य असू शकते. परंतु, खासगीरित्या बोअरवेल करताना तशा परवानगीची गरज भासत नसल्याने पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये अशा बोअरवेल मंजूर होण्यासाठी टंचाई निवारणास प्राधान्य देऊन भारतनिर्माणचे नियमच कालबाह्य ठरविण्याची गरज आहे.
पोलादपूर तालुक्यातील गेल्या दोन-चार वर्षांत फुटलेले लोहारेखोंडा, तुर्भे खोंडा, किनेश्वरवाडी, चांभारगणी (महाळुंगे), कोतवाल, कोंढवी साठवण तलाव, बोरघर आदी लघुपाटबंधारे विभागाच्या योजनांचे नारळ भूजलाचे नियोजन करण्यात कितपत यशस्वी ठरतील, याबद्दलची साशंकता ग्रामस्थांची प्रस्तावित प्रकल्पाला सावध विरोधाची भूमिका निर्माण करीत आहे. तल आणि मृद संधारणाचे महत्व समजावे आणि लोकसहभागातून पाणीबचतीची चळवळ उभी राहण्यासाठी गेल्यावर्षीपासून पोलादपूर तालुक्यातील देवळे, आडावळे खुर्द, साळवी कोंड, गोवले, खांडज, बोरघर, वडघर बुद्रुक, कामथे, सडवली, काटेतळी, कापडे बुद्रुक, बोरावळे आणि ताम्हाणे या 14 गावांमध्ये ‘प्री वॉटर कप’ स्पर्धेचे
आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेतेपद देवळे ग्रुपग्रामपंचायतीने प्राप्त करूनही अलिकडेच एका वृत्तवाहिनीच्या दुष्काळयात्रेत ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्यासमोर देवळे गाव कसा दुष्काळग्रस्त, या विषयावर बोलण्यासाठी चढाओढ दिसून आली. याखेरिज, तालुक्यातील नळपाणी योजनांची मृतावस्था व दुरवस्थादेखील भूजलाच्या नियोजनाची सद्यस्थिती फारच बिकट असल्याचे दाखवून देत आहे.
पोलादपूर तालुक्यातील सावित्री, कामथी, घोडवनी, ढवळी आणि चोळई नद्यांच्या पात्रामध्ये प्रचंड दगड-गोटयांचा गाळ साठून नद्यांची पात्रं कोरडी झालेली दिसून येत आहेत. ’एमआरइजीएस’मधून नद्यांच्या गाळसफाईसाठी कोणतीही योजना तालुक्यात कोठेही आखण्यात आली नसल्याने केवळ रेती उपशावर उपजिविका साधणार्यांसोबत अलिकडेच एलऍण्डटी कंपनीकडून सावित्री नदी पात्रामधील दगड-गोटे उपसा केल्यानंतर पावसाळयानंतरही पाण्याचे कुंड भरलेले दिसून येतील,अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, हा दगड गोटयांचा गाळ उपसा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी वापरल्याने सूर्याच्या तप्तकिरणांचा उष्णतेत रूपांतर करून उत्सर्जन होऊन तब्बल 45.5अंश
सेल्सीयस तापमानवाढ होऊन ती कोकणातील त्यादिवशीची सर्वाधिक तापमानाची नोंद ठरली होती. अनेक तलावांचाही गाळउपसा केला गेल्यास तेथे साधारणत: मार्च महिन्यापर्यंत भूजलाचा साठा शिल्लक राहू शकेल. पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखडयामध्ये भूजलाचे नियोजन समाविष्ट नसल्याचे दिसून येते. खरं तर ’नेमेचि येतो मग पावसाळा’ ही निसर्गाची कृतीच दरवर्षीच्या पाणी टंचाईवरील खरा उपाय असूनही प्राधान्यक्रम न ठरविल्याने वनराई बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट निवडणूक तसेच अन्य सरकारी कामांमुळे तालुक्याला पूर्ण करता येत नाही. एकंदरित, पोलादपूर तालुक्यातील राजकीय पुढार्यांच्या प्रगतीचे स्त्रोत ठरलेल्या रस्ते, पाणीयोजना आणि शाळाइमारतींच्या दुरवस्थेला आत पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे.
-शैलेश पालकर