प्रेमप्रकरणाची परिणती दर खेपेला विवाहातच होईल, अशी शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी कोणाही एकाचा रस दुसर्याच्या बाबतीत संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे नाते संपुष्टात आणण्याची मोकळीक स्री-पुरुष दोघांनाही सारख्याच स्वरुपात असते. असे असतानाही स्रीला मात्र नात्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आणि पुरुष नात्यातून बाहेर पडल्यास ती मात्र फसवणूक कशी काय ठरते?
‘हॅशटॅग मी टू’ची चळवळ अतिशय जोमाने सुरु असताना देखील त्यातील काही प्रकरणांतील आरोपांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न निर्माण केले जातच होते. भारतात ही चळवळ जसजशी अधिकाधिक टीव्ही, चित्रपटांच्या ग्लॅमरच्या दुनियेतील व्यक्तींच्या संबंधापुरतीच सीमित राहताना दिसू लागली तसतसा विश्वासार्हतेचा मुद्दा ठामपणे उपस्थित केला जाऊ लागला. स्रियांचे लैंगिक शोषण रोखण्याच्या हेतूने सुरु झालेल्या या चळवळीतील काही प्रकरणांत संबंधित पुरुषच खोट्या आरोपांचा बळी ठरतोय की काय, अशी शंका उपस्थित होऊ लागली. विशेषत: ज्या प्रकरणांमध्ये आरोप दोन-तीन किंवा काही वेळेला दहा-बारा वर्षांनंतर केले जात होते, तिथे अशी शंका घेण्याला जागा होती. आरोप करण्यामागे संबंधित स्रीची त्रास देण्याची, सूड उगवण्याची वा पैसे उकळण्याची तर भूमिका तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला जाऊ लागला. एका तरुणीने बलात्काराचा आरोप केल्याने टीव्ही मालिकांतील अभिनेता करण ओबेरॉयला पोलिसांनी अलिकडेच अटक केली. त्याला पोलिस कोठडीही ठोठावण्यात आली. 2017 मध्ये एका डेटींग अॅपच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. मात्र अलिकडेच त्याने आपल्यावर जबरदस्ती केली आणि पैसेही उकळले असा आरोप संबंधित तरुणीने त्याच्यावर केला आहे. मात्र त्या तरुणीच्या विरोधात लगेचच दुसर्या दिवशी करण ओबेरॉयच्या मित्रमैत्रिणींनी पत्रकार परिषद घेऊन या तरुणीचे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसेच शरीरसंबंधाचा प्रस्ताव याच तरुणीने करण समोर ठेवल्याचे सांगत त्यासंबंधीचे व्हाट्सअॅप संदेशाचे पुरावेही मिडियासमोर ठेवले. तसेच एकतर्फी प्रेमातून या तरुणीने आरोप केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देशातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राने या प्रकरणाला मोठी प्रसिद्धी दिली आहे. या प्रकरणात नेमके काय दडले आहे ते चौकशीतून पुढे येईलच. पण यासारखीच इतर अनेक प्रकरणे अधूनमधून बातम्यांमधून दिसतच असतात. प्रेमप्रकरण सुरु असताना सज्ञान युगुलामध्ये परस्पर संमतीने घडलेल्या शरीरसंबंधांचे वर्णन नंतर विसंवाद झाल्यावर ’बलात्कार’, असे आकसाने केले जाते की काय अशी शंका घेण्यास जागा आहे. समान न्यायाच्या तत्वावर ही बाब पटत नाही. नाते संपुष्टात आल्यानंतर जसा भावनिक त्रास स्रियांना होतो तसाच तो पुरुषांनाही होतो. अर्थात सामाजिक अप्रतिष्ठेच्या संदर्भात स्रियांना प्रतिकूल परिस्थितीशी तोंड द्यावे लागते. महानगरांमध्ये स्री-पुरुष सारख्याच मोकळेपणाने समाजात वावरत असतात. त्यामुळे उभयतांमधील नात्यांच्या संदर्भात कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी कायद्याने घ्यायलाच हवी.