Breaking News

कर्माचे फळ

देशाचे नाही पण राज्यातील राजकारणात तसेच समाजकारण व विविध क्षेत्रात चुलते (काका) पुतणे वाद चांगलाच परिचित आहे. अगदी सामान्यातील सामान्य कार्यकर्ता ते मोठ्यातील मोठा राजकारणी, समाजकारणी, समाजसेवक यांना पुतणेप्रेम घातक ठरले आहे. अगदी पूतनामावशीच्या प्रेमासम. कधी काकाचे प्रेम अपुरे पडत असेल किंवा हात आखडता घ्यावा लागला असेल, तर काका-पुतण्या वाद निर्माण होत अगदी संघर्षाचे वातावरण तयार होत रक्ताच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे, घरगुती वादाचे अनेक प्रकार समोर आले आहेत.

पुतण्या या शब्दाचा वाईट प्रभावच इतका आहे की काका-पुतण्या वाद हा पाचवीलाच पुजला असल्याची खात्री व्हावी. काकाकडे अनुभवाची शिदोरी असल्याने मोठ्या मनाने पुतण्या या नात्याला जपले जाते आणि हतबल झाल्यावर काका मला वाचवा, अशी आरोळी ठोकण्याची वेळ पुतण्यावर आल्याचे  अनेक प्रसंग आहेत. राजकीय घराण्यात हा वाद अगदी विकोपाला गेला आहे. या वादाने राजकीय समीकरण बिघडले आहे. अनेक राजकीय नेते या वादात भरडले जात संघटना फुटीच्या मार्गावर आल्या आहेत, तर काही संघटनांत भविष्यात दुफळी होऊ शकते. याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जयदत्त क्षीरसागर, सुजय विखे-पाटील या ताज्या घटना असल्या तरी याआधी राज्यातील मोठ्या घराण्यांत हा वाद उफाळून आल्याच्या घटना घडल्या आहेत आणि या वादातून राजकीय पक्षांतर हा रामबाण उपाय यावर गुणकारी ठरत आहे. फुटीचा फटका मागील पाच वर्षांत सर्वात जास्त राष्ट्रवादी काँग्रेस व काही प्रमाणात राष्ट्रीय काँग्रेसला बसला आहे. या पक्षातील लहानातील लहान कार्यकर्ता ते अगदी सतत सत्तेचा भागीदार झालेला नेता सहज पक्षांतर करीत असून भारतीय जनता पार्टी व शिवसेना या पक्षांना प्राधान्य देत आहेत. देशात राष्ट्रीय काँग्रेसची मोठी फळी भारतीय जनता पक्षात सामील होत आहे. मागील तब्बल 60 वर्षे सत्तेची फळे चाखणार्‍या काँग्रेसी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना सत्ता पाच वर्षांपासून हातातून गेल्याने तसेच यापुढे सत्ता येईल असे कुठलेच संकेत नसल्याने कार्यकर्त्यांची पळापळ सुरू आहे. सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्याने व भविष्यात त्यामध्ये सुधारणा निर्माण होण्याची शक्यता कमीच असल्याने काँग्रेसी नैराश्यावस्थेत आहेत. यापुढे या जहाजाला एखादा फिरस्ताच वाचवू शकतो, अन्यथा काँग्रेसची अवस्था यावरूनही बिकट असेल, असे जाणकारांचे मत आहे. महाराष्ट्राच्या सह्याद्रीने

काँग्रेसला दिल्ली तख्तावर सत्ता काबीज करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे, मात्र तसे नेतृत्व सध्या काँग्रेससाठी महाराष्ट्रातही नाही. पुढील काळ काँग्रेससाठी बुडत्याचा पाय खोलात या स्थितीत असेल हे भाकीत सांगण्यास कोणत्या भविष्यकाराची गरज नाही. काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात विरोधी पक्षातील अनेक रथी-महारथींचे गाठोडे आमिषाच्या जाळ्यात अडकवून पक्षात घेतले. विरोधी पक्ष खिळखिळा केला. ज्या विरोधी पक्षाच्या नेतृत्वाने आपल्या रक्ताचे पाणी करीत, कुटुंबाची पर्वा न करता पक्ष संघटनेत सक्षम  कार्यकर्ते घडविले, ते बाळसे धरलेले रेडिमेड कार्यकर्ते, नेते काँग्रेसने पक्षात घेऊन पक्षाच्या सीमा वाढवल्या, विस्तार केला. हीच थेअरी राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाने स्वीकारत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष विशेषतः शिवसेना पक्ष बाळासाहेब हयात असतानाच पक्की यारी-दोस्ती असताना बाळासाहेबांच्या उतरत्या वयात छिन्नविच्छिन्न करण्याचे मनसुबे रचत त्या प्रयत्नांना प्रत्यक्षात साकार केले व सत्ता राबवली.

कधी काळी घरभेदीपणा करण्याचे, घर फोडण्याचे कामही केले. त्या कार्यालाही चांगले यश आले आणि सत्तेवर पक्षाचा झेंडा रोवण्यात यशस्वी झाले. याच नेतृत्वाने काँग्रस पक्षाशीही काडीमोल करीत दोन वेळा बाहेरचा रस्ता धरला व नवीन प्रादेशिक पक्ष स्थापन करीत सत्ता भोगली. पहिल्यापेक्षा दुसर्‍या वेळेस अधिक यशस्वी होत 15 वर्षे सत्ता भोगली. या काळात कधी छगन भुजबळांसारखा बलशाली नेता शिवसेनेतून काँग्रसमध्ये घेतला व नंतर राष्ट्रवादी काँग्रसच्या सत्तेत बलशाहीपद देऊन शिवसेनाप्रमुखांना प्रतिआव्हानाच्या डरकाळ्या फोडावयास लावल्या. ज्या संघटनेत हा नेता नव्हत्याचा होता झाला, रंकाचा राव झाला, भाजी-फुले विकणारा हजारो करोडोंचा मालक झाला, त्या करोडोंच्या लोभापायी दीड वर्ष आर्थर रोडच्या तुरुंगाची हवा खाऊन आला. 1991मध्ये

आपल्यासोबत 11 आमदार घेऊन पक्षांतर केले. तरीही ‘मातोश्री’ने त्या नेत्यावर प्रेम कमी केले नाही. या नेत्यांच्या  सहवासातील नेते मातोश्रीवर गेले असता माँसाहेब मीनाताई ठाकरे त्यांना विचारणा करीत असत, तुम्ही आलात, आमचे भुजबळ कुठे आहेत. एवढे भरभरून प्रेम मातोश्रीचे मिळाले होते. त्यानंतर गणेश नाईकांसारखा नेता गळाला लागला. त्यांच्याबरोबर समर्थक. नवी मुंबईसह रायगड ताब्यात घेतला. सत्ता भोगली. अनेक आमदार, पदाधिकारी, जिल्हाप्रमुख सत्तेच्या जाळ्यात घेतले. भास्कर जाधव, प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे, राहुल नार्व्हेकर अशी शिवसेनेच्या मुशीत बांधलेली कच्ची मडकी पक्की झाली आणि पक्षांतर करते झाले. नारायण राणे, राज ठाकरे गेले.

अशी नेतेमंडळी जात असताना शिवसेनाप्रमुखांची अवस्था काय झाली असेल याचा विचार त्यांच्या सख्ख्या मित्राने केला नाही की त्यांना सबुरीचा सल्ला दिला नाही. उलट शिवसेनेचे गड कसे ढासळतील याचाच विचार केला. तो फक्त सत्तेसाठी. तो काळ आता बदलला आहे. नरेंद्र मोदींच्या रूपाने जशी काँग्रेस ढासळली आहे, तशीच राष्ट्रवादीही पूर्ण खिळखिळी झाली आहे. नेतृत्वाला बाहेरून आव्हानाची भाषा वापरली जात आहे तशीच घरातूनही. कधी नदीच्या पाण्यावरून, तर कधी एतच मतदान मशिनवरून. मावळमधून नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देणार नाही, असे जाहीर करणार्‍या पक्षनेतृत्वाला आपला शब्द फिरवावा लागला आहे. जुने जाणते नेते, कार्यकर्ते पक्ष बदलण्याची भाषा बोलू लागले आहेत. नेत्यांच्या मनातले ओठावर येत आहे. शिवेंद्रसिंहराजे, रामराजे निंबाळकर चलबिचल आहेत. उदयनराजे आपली भाषा सांगू लागले आहेत. पवारांची पॉवर  कमी झाली का, असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. ज्या पवारसाहेबांनी संघटना वाढीसाठी रक्त आटवले, आजारपणाची तमा बाळगली नाही, वा

पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असा समज निर्माण करीत महाराष्ट्रात जाणता राजा म्हणून वावरले, सत्तेची फळे आपल्या बगलबच्च्यांना चाखण्यासाठी दिली, तेच बच्चे उतरत्या वयात, तब्येतीची काळजी करण्याच्या अवघड क्षणी आव्हानात्मक भाषा बोलू लागल्याने पवारसाहेबांच्या मनाची अवस्था काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी. माश्याचे अश्रू पाण्यात दिसत नाहीत, अशी म्हण आहे. बाळासाहेब त्यासाठी काळा चष्मा वापरायचे. दुःख व अश्रू लपवण्यासाठी, मात्र पवारसाहेबांनी डोळ्याला कधी काळा चष्मा लावला नाही आणि या वेळी लावू शकणार नाहीत. त्यांना त्यांचे अश्रू मनातल्या मनात दाबून ठेवावे लागतील.

राष्ट्रवादीमधून शिवसेनेत तसेच भाजपत प्रवेश करणार्‍यांची यादी लांबलचक आहे. गुरुवारी मुंबई सचिव शेखर लाड यांनी आपल्या 50 समर्थकांसह शिवसेना भवनात  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेपेक्षा भाजप, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीची दाणादाण करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होत आहे. अजूनही त्यांना यश येत आहे. या घटनांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  कोणत्या नजरेने घेतात ते पुढील कालावधीत पाहणे आवश्यक ठरेल.

बाळासाहेबांनी फुटून जाणार्‍या आमदार-खासदारांना जाहीर सभेत दम दिला होता व शिवसैनिकांना आदेश दिले होते की, यापुढे खासदार किंवा आमदार शिवसेनेतून बाहेर गेला तर त्याला ज्या ठिकाणी सापडेल तिथे कपडे

फाटेपर्यंत बदडून काढा. कायद्याची तमा बाळगू  नका. हे वचन शिवसैनिकांनी खरे करून दाखवले होते. आता हेच फासे 10-15 वर्षांनंतर राष्ट्रवादीवर उलटले आहेत. शरद पवार काय हालचाली करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply