आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांच्याकडून शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त
शिवसेनेचे महाडमधील आमदार भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असणार्या पनवेलमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचे रविवारी (दि. 22) जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी उपस्थित राहून मंत्रीमहोदयांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख परेश पाटील व महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या पुढाकाराने आयोजित या सत्कार व स्वागत सोहळ्यात कळंबोली सर्कल येथून बाईक व गाड्यांच्या रॅलीने मंत्री भरत गोगावले पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आले. येथे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. डीजे, ब्रास बँडसह जेसीबीमधून फुलांची उधळण करत तब्बल 50 फुटी हार घालून व फटाक्यांच्या आतषबाजीत मंत्री गोगावले यांचे भव्य स्वागत व सत्कार करण्यात आला. पुढे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासदेखील त्यांनी मानवंदना दिली.
या सोहळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकीद काझी, प्रभाकर बहिरा, उपजिल्हाप्रमुख परेश पाटील, पनवेल महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, भाजप जिल्हा चिटणीस अमरीश मोकल, रूपेश धुमाळ, प्रकाश खैरे, अमित ओझे, सतिश पाटील, केदार भगत, महेश पाटील, राकेश गायकवाड, समीर केणी, विद्याधर मोकल आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रयतेची सेवा केली तशीच सेवा करण्याची प्रेरणा मंत्री भरत गोगावले यांना मिळो, अशा शुभेच्छा आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी दिल्या. पुढे शिरढोण येथे आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकास अभिवादन करून मंत्रीमहोदय त्यांच्या महाड मतदारसंघाकडे रवाना झाले.