पनवेल : बातमीदार
निसर्ग चक्रीवादळाचा फटका पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. झाडे, विजेचे खांब तसे तारा कोसळल्याने येथील जनजीवन विस्कळीत
झाले आहे.
वादळामुळे पनवेल ग्रामीण भागातील ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तसेच काही झाडांचे मोठे फांदी खाली तुटून पडले. नेरे पाडा, भानघर येथी ल गावातील विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने वीज गायब झाली. तर काही ठिकाणी विजेचे खांब पडले. मोबाइलचे नेटवर्क देखील गायब झाल्याने कुठे काय घडले याचा देखील नागरिकांना थांगपत्ता लागत नव्हता. मोठ्या प्रमाणात वादळी वारा सुरू झाल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. काही ठिकाणच्या घरांचे पत्रे उडून गेले. त्यामुळे भर पावसात त्यांच्या घरांमध्ये पाणी पाणी साचले होते.
वीज नसल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना वीजेविना रात्र घालवावी लागली तर दुसर्या दिवशी गुरुवारी देखील विजेचा पत्ता नव्हता. बर्याच ठिकाणी विजेचे खांब तुटलेले आहेत त्यामुळे ते नवीन बसवण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल असे समजते. जुना पुना हायवे येथील 45 झाडे पनवेल तालुका पोलिसांनी जेसिबीचे मदतीने रसत्यातून बाजूला केले आहेत. पनवेल तालुक्यातील एकूण 1950 घरांची पत्रे उडून गेली त्यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले. तालुक्यातील मोरबे परिसरातील घरांचे जास्त नुकसान झाले आहे तर जवळपास बाराशे हून अधिक झाडे उन्मळून पडली. तालुक्यातील 50 ते 60 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून महावितरणचे जवळपास साडेतीनशेहून अधिक विजेचे खांब खाली पडले. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज गायब आहे. वादळामुळे ग्रामीण भागात प्रचंड नुकसान झालेले दिसून येत आहे. सद्यस्थितीत याद्या बनवण्याचे काम सुरू असून पंचनामे देखील सुरू असल्याची माहिती पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनी दिली.