Breaking News

मोदी है तो मुमकिन है

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी दिवाळी दोन दिवस अगोदरच सुरू झाली. बिहारमधील प्रचंड दिग्विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे भरते आले असून पंतप्रधान मोदी यांच्यावर बिहारच्या जनतेने दाखवलेला विश्वास हे त्याचे कारण आहे. याखेरीज अन्य राज्यांमधील पोटनिवडणुकांमध्येही 59 पैकी 41 जागा भाजपनेच जिंकल्या असून त्याचेही श्रेय मोदीजींनाच जाते.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार हे विकासाचे आणि विश्वासार्हतेचे डबल इंजिन बिहारी मतदारांनी पुन्हा एकदा आपलेसे केले या पाठीमागे काही सामाजिक कारणे आहेत. मोदी आणि नितीशकुमार या दोघांजवळ दांडगा अनुभव आहे आणि मुख्य म्हणजे दोघेही नेते स्वच्छ आणि चारित्यसंपन्न प्रतिमेचे आहेत. त्यांच्यासमोर उभे ठाकले होते ते दोन्ही युवराज भ्रष्टाचाराच्या संगोपनातच लहानाचे मोठे झाले आहेत. विश्वासार्हतेच्या बाबतीत तर या डबल युवराजांचा पाड लागणे अशक्यच होते. तरीही पैशाच्या जोरावर प्रचाराच्या काळात त्यांनी माहौल असा उभा केला की मोदी-नितीश यांच्या जोडीसमोर मोठेच आव्हान उभे राहिले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे युवराज तेजस्वी लालुप्रसाद यादव यांनी जोरदार लढत दिली हे मान्य करावे लागेल. 10 लाख सरकारी नोकर्‍या देण्याची त्यांनी केलेली घोषणा आकर्षक होती, परंतु ती पोकळ घोषणाच आहे हे सार्‍यांनाच ठाऊक होते. तेजस्वी यादव यांच्या राजदला सर्वाधिक 75 जागा मिळाल्या. एका तरुण नेत्यासाठी हे यश देखील रग्गडच म्हणावे लागेल. तेजस्वी यादव यांचा तेजोभंग केला तो त्यांचे महागठबंधनमधील सहकारी राहुल गांधी यांनी. काँग्रेसने अवघ्या 19 जागा कशाबशा जिंकल्या असून राहुल गांधी यांना बहुदा या निवडणुकीचे गांभीर्यच कळले नाही. एकंदर निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अवघ्या आठ सभा घेतल्या. तुलनेने त्यांच्यापेक्षा कितीतरी अधिक व्यस्त असणार्‍या पंतप्रधान मोदी यांच्या सभांची संख्या याहून बरीच मोठी होती. गांभीर्याने लढणारा कुठला नेता असे वागतो. याउलट पंतप्रधान मोदी यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये किंचितही कसूर न करता आघाडी धर्म पाळला आणि नितीशकुमार यांच्यासाठी विजय सुनिश्चित करून दिला. हरयाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, मणिपूर, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात आदी राज्यांमध्ये 59 जागांवर पोटनिवडणुका पार पडल्या, त्यापैकी 41 ठिकाणी भाजपच्याच उमेदवारांवर जनतेने पसंतीची मोहोर उमटवली. या प्रचंड विजयाचे श्रेय अर्थातच पंतप्रधान मोदीजींनाच जाते. भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याचा साभिमान आनंद वाटतो. परंतु नेमक्या याच कारणामुळे मोदी विरोधकांचा मात्र पोटशूळ उठतो. पंतप्रधान मोदी यांची जादू किंचितही कमी व्हायला तयार नाही, उलटपक्षी दिवसेंदिवस ती वाढतेच आहे या वस्तुस्थितीचे आकलन विरोधकांच्या बुद्धिपलीकडचे आहे. तळागाळातील गोरगरीब आणि मध्यमवर्गीय यांच्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी देवदूताचे स्थान मिळवले आहे, कारण गोरगरीब माताभगिनींच्या घरामध्ये स्वयंपाकाच्या गॅसची सोय पुरवण्यापासून, जनधन खात्यामध्ये थेट रक्कम पोहचवण्यापर्यंत अनेक कामे पंतप्रधानांनी आस्थेने केली. कोरोनाच्या संकटकाळामध्ये गरीबांच्या घरात वेळच्या वेळी मोफत अन्नधान्य पुरवण्याकडेही त्यांनी लक्ष दिले. त्याचीच परिणती भारतीय जनता पक्षाच्या बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या विजयसभेमध्ये झाली. भारतीय जनता पक्ष शब्द पाळणारा पक्ष आहे. मखलाशी करून सत्ता बळकावणारा नाही हे बिहारमध्ये स्पष्ट दिसले आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply