उपाययोजना स्पष्ट केल्याशिवाय जमिनी देणार नाही; शेतकर्यांची भूमिका
उरण : प्रतिनिधी
जोपर्यंत शेतकर्यांना विरार अलिबाग बहुउद्देशिय प्रकल्पाची संपूर्ण माहिती आणि जागेचा योग्य मोबदला मिळण्याचे ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या प्रकल्पाला जमीन न देण्याची भूमिका उरणच्या शेतकर्यांनी घेतली आहे. या संदर्भात शेतकर्यांशी चर्चा करण्यासाठी पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उरण पंचायत सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी शेतकर्यांनी ही भूमिका जाहीर केली आहे.
एमएसआरडीसीकडून विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिका (मल्टीमॉडल कॉरिडॉर) हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या 126 किमी लांबीच्या मल्टिमॉडल कॉरिडॉरमध्ये मेट्रो, महामार्ग, तसेच सर्व्हिस रोड अशा सुविधा असणार आहेत. बहुउद्देशिय वाहतूक मार्गिकेत मुंबई, विरार, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, पनवेल आणि उरण इत्यादी भागाचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. या मार्गिकेमुळे नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदर, एमटीएचएल आणि डीएफसी हे जोडले जाणार आहे. या मार्गिकेतील नवघर ते चिरनेर हा पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी सध्या भूसंपादन आणि सर्वेक्षण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील बेलोंडाखार, दिघोडे, वेश्वी, जांभूळपाडा, गावठाण, जासई, भोम, चिखली भोम, चिरनेर, टाकीगाव, हरिश्चंद्र पिंपळे, नवापाडा, विंधणे, कळंबुसरे आणि कोळी बांधणखार या 16 महसुली गावांतील जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. या प्रकल्पासाठी सर्वेक्षण आणि मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना शेतकर्यांनी हुसकावून लावल्यानंतर शेतकर्यांना हा प्रकल्प समजावण्यासाठी उपविभागीय अधिकारी राहूल मुंडके यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
या बैठकीत शेतकर्यांनी विकासाला विरोध नसून आम्हाला आमच्या जमिनींचा योग्य मोबदला, प्रकल्पग्रस्त दाखले, येथे होणार्या मेट्रो स्टेशन, तसेच इतर आस्थापनांमध्ये नोकर्या, सर्व्हिस रोड, गावातील पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या उपाययोजना स्पष्ट केल्याशिवाय आम्ही या प्रकल्पाला जमिनी देणार नसल्याचे ठणकावले.
या वेळी राहुल मुंडके यांनी शेतकर्यांना या प्रकल्पाची माहिती देण्यासाठी लवकरच एमएसआरडीसी अधिकार्यांसमवेत एक प्रेझेंटेशन ठेवले जाईल, तसेच जमिनीचा मोबदला म्हणून रेडीरेकनरच्या चारपटपेक्षा अधिक मोबदला देण्यात येईल, असे सांगितले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, नायब तहसीलदार जी. बी. धुमाळ, नरेश पेडवी, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील, संतोष पवार यांच्यासह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.