Breaking News

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ लाटच जणू आली आहे. अबब म्हणावे अशीच अद्भूत व चमत्कारिक क्रेझ आहे. ही केवळ चित्रपटाची क्रेझ नाही तर अनेकांना पुष्पा 2 मध्ये जणू आपला तारणहार दिसला. अनेक सामाजिक राजकीय गोष्टींनी पिचून गेलेला समाज या प्रतिक्रियेतून मोकळा ढाकळा झाला. झुंडीच्या झुंडीने प्रेक्षक पुष्पराज पाह्यला आला तितका हा चित्रपट ग्रेट भलेही नसेल पण पहिल्याच दृश्यापासून हाऊसफुल्ल गर्दीवर मोहिनी टाकण्यात आणि तीन तास वीस मिनिटे खुर्चीला खिळवून ठेवण्यात चित्रपट यशस्वी ठरतोय असा सर्व प्रकारचा मसाला त्यात खचाखच भरलाय आणि त्यातील अतिशयोक्तीसह हा चित्रपट रसिकांनी स्वीकारलाय हे सत्य आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतलाय ही वस्तुस्थिती आहे. त्यात हा मुळात तेलगू चित्रपट आणि मग तो हिंदीसह कन्नड तमिळ व मल्याळम भाषेत डब केलेला. तरीही त्याला मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपट अशी ओळख मिळाली. अन्यभाषिक चित्रपटांपुढे हे मोठेच आव्हान आहे.
आज मल्टीप्लेक्सला जावे, प्राईम टाईमचे सगळेच खेळ ’पुष्पा 2…तेही चढत्या दरात. तिकीट दर कितीही असू देत आम्ही पुष्पा 2 पाहणारच असाच जणू हा बाणा आहे. हे एक प्रकारचे झपाटलेपण आहे. सोशल मिडियात पहावे तर ’पुष्पा2’चा भारी तडका. उत्पन्नाचे भरभर वाढणारे आकडे, अल्लू अर्जुनचे पुष्पराज रुपातले फोटो, हिंदी झालेच, तेलगू (मूळ चित्रपट याच भाषेत आहे), तमिळ, कन्नड व मल्याळम भाषेतील खेळ सुटतोय तोच या पिक्चरने विलक्षण भारावून गेलेल्यांच्या उत्फूर्त, मनमोकळ्या प्रतिक्रिया, अनेकांना तर काय बोलू, किती बोलू, कसं बोलू असे झालेले. काहींनी झुकेगा नहीं साला असे म्हणत, गळ्यातून उजवा हात डावीकडे नेत आपले प्रेम व्यक्त केले. सगळेच एकदम मस्त नि भन्नाट. जणू सगळेच जण पुष्पा 2 च्या दिशेनेच धावताहेत, पुष्पा 2 पाहून वेडेपिसे झालेत. एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, मिडिया, सोशल मिडियातील वातावरण ढवळून काढले. त्याच्या उत्पन्नाचे भले भले मोठे आकडे येताहेत. थिएटरमध्ये पब्लिक येत नाहीत याला जणू एक चोख उत्तर यातून दिले जातेय. त्याच वातावरणात आपणही हा चित्रपट पाह्यला हवा, अन्यथा आपण समाजात मागे पडू, व्हॉटस अप ग्रुपवरील चर्चेत आपण आपले मत मांडू शकणार नाही याची भीती. तेही या भडक मनोरंजनाकडे वळले.
पिक्चर हिट, सुपरहिट होणे नवीन आहे का? अजिबात नाही. मूकपटाच्या काळापासून ते चाललय. आपल्या समाजावरील दृश्य माध्यमाची मोहिनी अफाट व अचाट आहे. आणि चित्रपटाच्या जगात यश हेच सर्वात मोठे टॉनिक ही केवढी मोठी वस्तुस्थिती. पिक्चर सुपर हिट है तो सबकुछ खुशमंगल है. ते तर छोटी भूमिका साकारणार्‍यास देखील सुखावते. कुठेही गेलो तरी त्याच यशाच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. शोले पन्नाशीत आहे तरी विजू खोटे आठवताना कालीयाही आठवतो, मॅकमोहन आठवताना अरे ओ सांभादेखिल आठवतो. ’जय संतोषी मा (मुंबईत रिलीज 30 मे 1975) चे पन्नासावे वर्ष सुरू आहे, आजही त्याच्या कथा, दंतकथा, गोष्टी, किस्से आवर्जून सांगितले जातात. एका गावात थिएटरबाहेर चपला काढून भाविक हा चित्रपट पाह्यला जात. तर कुठे पडद्यावर मै तो आरती उतारु रे सुरु होताच प्रेक्षकवर्ग उभे राहून त्या आरतीत सहभागी होई. त्या काळात अनेकांनी सोळा शुक्रवारचा उपवास केला. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीत अशा अनेक गोष्टी आहेत. त्या चित्रपटाच्या वाटचालीत सपोर्ट सिस्टीम ठरल्यात. चित्रपटाच्या इतिहासाइतकेच महत्व त्याच्या प्रेक्षकांच्या वाटचालीला आहे. त्यात इंग्लिश चित्रपटाचा प्रेक्षक, मराठीचा प्रेक्षक, हिंदीचा प्रेक्षक, भोजपुरीचा प्रेक्षक, साऊथच्या पिक्चरचा प्रेक्षक, महोत्सवात चित्रपट पाहणारा प्रेक्षक, उठसूठ आपल्याकडील कोणत्याच चित्रपटाना काहीच अर्थ नाही असे म्हणणाराही प्रेक्षक अशी अनेक य्रकारची वर्गवारी आहे.
या सगळ्यात यशाच्या गोष्टीत बरेच रंग
बॉबीच्या यशाने सिनेमात डिंपल कापडियाने घातलेल्या अनेक प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनाना, तशाच स्टाईलच्या कपड्यांची क्रेझ आली. बॉबी कंगवा, बॉबी लिपस्टिक अशा अनेक गोष्टींसह फूटपाथपासून सगळीकडेच मागणी वाढली. सुपर हिट चित्रपट पडद्यावर राहत नाही तो असा समाजात येतो.
’हम आपके है कौन च्या यशाने आपल्या समाजातील लग्न संस्कृती जणू इव्हेन्टस आहे हे रुजवले. आपल्या संस्कृतीत समाजातील सर्व स्तरात लग्न कार्य पूर्वापार. त्यात चालीरिती, परंपरा, मूल्य यांची छान जपणूक. हम आपके…ने त्यात अधिकाधिक रंगसंगती, देखणेपण, झगमगाट, संगीत, वराचे बूट लपवणे याचं महत्व वाढवले. मध्यमवर्गीयांनीही आपल्या कुटुंबातील लग्नाचे बजेट वाढवले. दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगेने नोकरी व्यवसायानिमित्त विदेशात गेलेले/ असलेले भारतीय अथवा तिकडेच स्थायिक असलेले अनिवासी भारतीय यांच्यातील लग्न जुळणे वाढले. आणि तेही लग्न करायला भारतात येवू लागले. लग्न लागताच काही दिवसातच नवदाम्पत्य इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेत झेपावतातही. चित्रपटाच्या यशाचे फंडे अनेक. सत्तरच्या दशकापर्यंत जुन्या चित्रपटातील लोकप्रिय गाणी पुन्हा पाहण्यासाठी सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृह युगात ते चित्रपट मॅटीनी शोला आल्यावर पुन्हा पुन्हा पाहिले जात. बसंत बहार, गुंज उठी शहनाई, बरसात, श्री 420, नौ दो ग्यारह, दो ऑखे बारह हाथ, अंदाज, हम दोंनो, जागते रहो, नया दौर, कोहिनूर, चलती का नाम गाडी असे अनेक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट गाण्यांच्या लोकप्रियतेने एका पिढीतून पुढील पिढीत जात राहिले. ते वेड वेगळेच. त्यात कुठेच आक्रस्ताळेपण नाही. पडद्यावर गाणे सुरु होताच तल्लीन होऊन जायचे एवढेच ठावूक. कधी आवडत्या गाण्यासाठी पडद्यावर पैसेही उडवले जात. अनेक गाण्यांच्या जन्मकथाही अतिशय रंजक. इंपिरियल थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या अलबेला (1951) ची गाणी लोकप्रिय होताच दोन आठवड्यानंतर त्याची गर्दी वाढत वाढत गेली. गंमत म्हणजे, सत्तरच्या दशकात हाच ’अलबेला ’ चित्र खजिना वितरणने पुन्हा प्रदर्शित करताच
मागची व पुढची पिढी तो एकत्र येऊन एन्जॉय करु लागली.
सैराटचे झिंग झिंग झिंगाट गाणे पडद्यावर सुरू होताच पडद्यासमोर येत नाचण्याचा मोह अनेकांना टाळता आला नाही. त्याचे व्हिडिओ व्हायरल कधी झाले हे समजलेच नाही. आणि सैराट पाह्यला निघतानाच अनेकांची आपल्याला सीटस सोडून नाचायचेय अशी मानसिक तयारी झाली आणि अनेकांनी या नृत्याचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतला. आपल्या देशात अनेकदा तरी फक्त चित्रपट पाहणे इतकेच नसते तर त्यासह अशा अगणित गोष्टी असतात. त्याचा धांडोळा केवढा तरी मोठा होईल.
रजनीकांतच्या भल्या मोठ्या कटआऊटला दूधाने आंघोळ घालणे, नवीन चित्रपटाचा पहिला खेळ पहाटे असणे, त्यासाठी ढोल ताशाच्या गजरात नाचत नाचत येणे हे म्हणजे एकादा सणच. ओटीटी युगात आजही चित्रपटगृहात जाण्यास इच्छुक असणारा मोठा वर्ग आहे हेही या सार्‍यातून दिसते.
अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2चे हैदराबादमधील जबरा स्वागत असेच. त्याचा भला मोठा कटआऊट, त्यावर दूध, भला मोठा हार, आवाजी फटाके, वाजत गाजत चित्रपटाचे स्वागत. आणि सोशल मिडियात या सगळ्याच्या व्हिडिओला भरपूर सकारात्मक लाईक्स, कॉमेन्टस, शेअर.
चित्रपट सुपर हिट होण्याची परंपरा एक मोठाच फ्लॅशबॅक आहे. पुष्पा 2 ने लोकप्रियतेत विलक्षण उंची गाठताना प्रेक्षकांचे काही वेगळेच रुप दिसतेय, शोलेचे पन्नासावे वर्ष सुरु असतानाच शोले ते पुष्पा 2 प्रेक्षक संस्कृतीतील प्रतिसादाचा बदलता रंग त्यात दिसतोय. तो चित्रपटात वेगळे प्रयोग करणार्‍यांना अजिबात पटणारा नाही ही याची दुसरी बाजू.

दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply