Breaking News

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी!

लाभले आम्हास भाग्य,  बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी, आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी, आमुच्या उराउरात स्पंदते मराठी, असे आपण फक्त म्हणतो.  म्हणूनच 14 ते 28 जानेवारी 2022 हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा लागत आहे. या पंधरवड्याच्या निमित्ताने कथाकथन, काव्यवाचन अशा विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून  मराठी भाषेचा जागर करण्यात येत आहे. मराठी भाषेच़े वय हे साधारणपणे 1500 शे वर्ष मानले ज़ाते. या काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा बदलत राहिली, असे मानले ज़ाते. मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. ’अमृतासही पैजा जिंके’ अशा शब्दांत ज्ञानेश्वरांनी या भाषेचं कौतुक केलं होतं. जसा काळ बदलतो तसे भाषेमध्येही बदल होतात. बोली भाषादेखील तितक्याच समृद्ध आहेत. त्याची लाज वाटण्यासारखं काहीच नाही. उलट बोली भाषेमुळे आपण विशिष्ट प्रांतांची ओळख मोठी करतो. पैठण (प्रतिष्ठान) येथील सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेच़ा प्रशासनात सर्वप्रथम वापर केला. देवगिरीच्या यादवांचा काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झ़ाली. मराठी ही भाषा देवनागरी लिपीमधून लिहिली ज़ाते.   देवगिरीच्या  यादवांच़े महाराष्ट्रावर राज्य असल्याने मराठी भाषेला राजभाषेच़ा दर्जा होता.  त्या काळात महानुभाव या पंथाची सुरुवात झाली. यामुळे संतांची परंपरा जन्मास आली व त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे काव्यरचनेस सुरुवात केली. मराठी साहित्याच़े दालन वैविध्यांनी समृद्ध केले. यादवांच़े राज्य संपून मुसलमानी आक्रमकांच़ा काळ सुरू झ़ाला. त्यांना स्थानिक लोक व भाषेचे काही कर्तव्य नव्हते. सरकारी भाषा फारसी झ़ाल्याने मराठी भाषेत ’तारीख’ सारख्या अनेक फारसी शब्दांच़े आगमन झाले. अशा धकाधकीचा काळातही मराठी भाषेत साहित्याची भर पडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळात मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. याकाळात मोरोपंतांनी मराठी भाषेत ग्रंथरचना केल्या. तसेच श्रीधर या कवीने आपल्या हरिविजय व पांडव प्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोच़वल्या. याच़ काळात शृंगार व वीररसांना स्वतंत्र स्थान मिळाले. यासाठी लावणी व पोवाडा हे नवीन वाङ्मय प्रकार मराठीत निर्माण झ़ाले. याच़ काळात बखर लेखनाची सुरुवात झ़ाली. इ.स. 1947 नंतर मराठीला अधिकृत राज्यभाषेच़ा दर्जा मिळाला. इ.स. 1960 मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेच़ा मुकुट प्राप्त झाला. मराठी भाषा  मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली ज़ाते. भारताच्या राज्यघटनेतील 22 अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीच़ा समावेश आहे. मराठी ही महाराष्ट्र राज्याची एकमेव अधिकृत राजभाषा आहे. गोवा राज्यात कायद्यानुसार कोकणी ही राजभाषा असली तरी   मराठीच़ा वापरही शासकीय कामकाजासाठी केला जातो.  दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशात मराठी एक अधिकृत राजभाषा आहे. मराठी भाषेचं एक खास वैशिट्य म्हणजे तिच्या बोलीभाषा. मुंबई, पुणे, नाशिक अशा महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये अनेकजण मराठीमध्ये बोलतात पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये दर 12 कोसानंतर संस्कृती बदलते आणि सोबतच भाषादेखील बदलते. मराठीप्रमाणेच प्रदेशागणिक बदलत जाणार्‍या बोली भाषेची एक वेगळी ओळख आहे. काही लोकांची त्यावरून थट्टा होते पण आजकाल सिनेमा, टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये बोली भाषेचा वापर वाढल्याने आता प्रांताच्या सीमा पुसट होऊन अनेकांनी ते शब्द नेहमीच्या बोलण्यात वापरायला सुरूवात केली आहे. मराठी ही एक समृद्ध भाषा असली तरीही तिच्या 13 खास बोलीभाषांची मज्जादेखील काही और आहे. कोकण प्रांतात आणि प्रामुख्याने तळकोकणातील भाषा अत्यंत मधाळ आहे. हेल काढून आणि अनुनासिक उच्चार यामुळे या भाषेचा गोडवा काही और आहे. मालवणी नाटक आणि दशावतार यामुळे ही बोलीभाषा आज जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचली आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागांना ’झाडपट्टी’ म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्यांची बोलीभाषा ’झाडीबोली’. ’ण, छ, श, ष आणि ळ’ ही पाच व्यंजने या भाषेत वापरलीच जात नाहीत. नागपूर, वर्धा, चंद्रपूर या भागांमध्ये नागपुरी भाषा थोड्या वेगळ्या लहेजाने बोलली जाते. या भाषेवर हिंदी आणि उर्दुचा प्रभाव आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये खास अंदाजात भाषा बोलली जाते. या भाषेत नाद आणि लय असल्याने ती ऐकायलाही खास वाटते. अनेक सहित्यिकांनी त्याचा आपल्या लिखाणात वापर केला आहे. रावेर, जामनेर या भागामध्ये ’क’ ऐवजी ’ख’ बोललं जातं. बहिणाबाईंच्या कवितांमध्ये या भाषेचा अनेकदा वापर केलेला दिसून येतो. अहिराणी आणि तावडी सारखी वाटत असली त्यामध्ये फरक आहे. मध्य कोकणात प्रामुख्याने आगरी भाषा बोलली जाते.कोळी बांधवांमध्ये ही भाषा प्रामुख्याने आढळते.  रायगड, ठाणे या भागात अनेकजण आगरी भाषेमध्ये बोलतात. बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांतून वर्‍हाडी बोलली जाते. त्या भाषेत  ’ड’चा ’ळ’, ’ळ’चा ’य’ म्हणून वापर केला जातो. भिल्ल समाज प्रामुख्याने देहवाली भाषेत बोलताना तुम्ही पाहिलं किंवा ऐकलं असेल. देहवालीच्या मूळ स्वरात ’ळ’, ’क्ष’ आणि ’ज्ञ’ ही व्यंजने नाहीत, तर ’छ’, ’श’ आणि ’ष’ यांच्याऐवजी ’स’ हे एकच व्यंजन वापरले जाते. धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे.  मूळात रांगडेपणा हीच कोल्हापुरची ओळख असल्याने त्यांच्या भाषेमध्येदेखील रांगडेपणा दिसून येतो. थोडी खेडवळ आणि तरीही लय काढून बोलण्याची पद्धत असल्याने त्याला खास गोडवा आहे. मराठी भाषेच्या विविध प्रकारांमध्ये पुणेरी मराठी ही व्याकरणशुद्ध म्हणून ओळखली जाते. सहित्य, कलाकार या विद्यानगरीमध्ये राहत असल्याने त्याचा प्रभाव येथील स्थानिकांवर दिसून येते. बेळगाव हा सीमाभागावरचा एक प्रांत आहे. कन्नड, चंडगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा सगळ्याच भाषांची येथे भेसळ आहे. अनेक साहित्यिकांना बेळगावी भाषेचा त्यांच्या साहित्यामध्ये समावेश करण्याचा मोह आवरला नाही. उत्तर कोकणातील ठाणे जिल्ह्यात किनार्‍यालगतच्या भागात वाडवळी बोली भाषा बोलली जाते. वसई भागातील स्थानिक प्रामुख्याने या भाषेचा वापर करतात. मराठी भाषा महाराष्ट्राची केवळ राजभाषा नसून संस्कृती आहे. दक्षिणेकडील राज्य आपल्या भाषेसाठी जे करतात त्यापैकी आपण काहीच करीत नाही. सरकारी कार्यालयात मराठीतून कामकाज व्हावे, असे आदेश काढूनही काही न्यायालये वगळता  त्याची कार्यवाही होत नाही. शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवून त्यांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश देण्यात आपण धन्यता मानतो. मराठी शाळा गावोगावी बंद होत आहेत, ज्या सुरू आहेत त्या मरणासन्न अवस्थेत आहेत. मुलांच्या उज्वल भवितव्यासाठी मराठी माणसे मराठी शाळांकडे पाठ फिरवीत आहेत. मराठी शिकून नोकरीची शाश्वती नाही, मग कोण कशाला मराठी शिकेल. शासकीय नोकरीसाठी प्राथमिक शिक्षण मराठीत झालेल्यांना 60 टक्के जागा राखीव ठेवल्या आणि राज्यातील सर्व उद्योगांना 40 टक्के जागा सक्तीच्या केल्या तरच मराठी भाषा टिकून राहील. ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतात  ते पालक आपल्या बबली-बंटीला मराठी वाचता येत नाही, असे अभिमानाने सांगतात. त्यामुळे हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कागदावर तर राहणार नाही ना, अशी शंका आल्याशिवाय राहत नाही.

-नितीन देशमुख

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply