उरण : रामप्रहर वृत्त
उरण-पनवेल मार्गावरील बोकडविरा ते जेएनपीटी कामगार वसाहतीपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून केली जात होती. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
पावसाळ्यात बोकडविरा, महाजनको कामगार वसाहत, फुंडे स्थानक, फुंडे महाविद्यालय, जेएनपीटी कामगार वसाहत आदी ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले होते. त्यामुळे येथील नागरिकांना खड्डे व धुळीतून प्रवास करावा लागत होता. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत होती. त्याची दखल घेत संबंधित विभागाने तातडीने रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.