Breaking News

कोण मारणार बाजी? महाराष्ट्राला उत्सुकता

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेलमध्ये सुरू असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा विजेता कोण होणार याची प्रतीक्षा रविवारी (दि. 31) संपणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारणार? आणि एक लाख रुपयांसह मानाचा अटल करंडक कोण पटकाविणार याची उत्सुकता राज्यातील रसिक प्रेक्षकांना लागली आहे.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा पनवेलमध्ये होत आहे. स्पर्धेत महाराष्ट्रातील 75 एकांकिका सहभागी झाल्या होत्या. त्यातून सरस 24 एकांकिकांची निवड सिने-नाट्य क्षेत्रातील परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी केली. स्पर्धेच्या पहिल्या आणि दुसर्‍या दिवशी प्रत्येकी नऊ एकांकिका सादर झाल्या, तर उर्वरित सहा एकांकिका रविवारी सादर होणार आहेत.

स्पर्धेचे दर्जेदार नियोजन या ठिकाणी बघायला मिळाले. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांच्या टीमनेही आयोजकांच्या आयोजनाची स्तुती करीत स्पर्धा अशीच सुरू राहावी असे वाटते, अशा शब्दांत पोचपावती दिली.

स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या एकांकिकेला एक लाख रुपये व मानाचा अटल करंडक, द्वितीय क्रमांकास 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास 25 हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांकास 10 हजार रुपये, उत्तेजनार्थ क्रमांकास  पाच हजार रुपये, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना यांनाही पारितोषिके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सरस अशा एकांकिकांचे सादरीकरण होत असल्याने यात कोण बाजी मारणार याची उत्कंठा महाराष्ट्राला लागली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply