Breaking News

तुम्ही वाचता, तेव्हा!

-भारत सासणे, अध्यक्ष, 95वे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद

तुम्ही वाचता तेव्हा तुम्ही काय करता? म्हणजे आपण वाचू लागलो आणि वाचत राहिलो तर आपल्या अस्तित्त्वामध्ये कोणते बदल होतात? एक तर, तुमची आतली कवाडं उघडलेली असतात.  ही कवाडं बाहेरून आत उघडणारी-स्वागतशील अशी असतात. बाहेरून काहीतरी त्या दरवाजाने आत, मेंदूपर्यंत, मनापर्यंत-कदाचित आत्म्यापर्यंत येऊ शकतं. आता ही आत येणारी ’वस्तू‘ किती मौल्यवान आहे, किती अस्सल आहे, यावर वाचनाचा आनंद अवलंबून असतो. तुमचे संस्कार जागृत होऊन नव्याने अविष्कृत होत असतील तर हे वाचन चिरस्मरणीय असेच होत असते. वाचता-वाचता तुम्ही एखाद्या अगम्य अंतर्यात्रेत निघून जाता किंवा कदाचित आत्मशोधाच्या प्रवासावर प्रयाण करता. वाचन म्हणजे जणू स्वतःचा शोधच असतो आणि आत्मशोध ही अपरिहार्य अशी अन् बहुधा अंतिम अशी मनाची अवस्था आहे. सुदैवी माणसाला त्यामुळे, आज ना उद्या वाचनाकडे वळावे लागते. आयुष्याच्या विविध टप्प्यांवर वाचन माणसाला समृद्ध करते. दिलासा देते-कदाचित जगणे सुसह्य करते. तुमची सूचना अशी आहे की, मी अलिकडे काय वाचले आहे किंवा काय वाचतो आहे याबाबत मी काही सांगावे. त्या निमित्ताने त्या पुस्तकांची मी ओळख करून द्यावी आणि त्या निमित्ताने या पुस्तकांचे थोडेसे रसग्रहण, थोडीशी समिक्षा करावी. येथे मी काही पुस्तकांचा परिचय नोंदवतो.आहे.

‘काउंट ऑफ मॉन्टेक्रिस्टो’

‘काउंट ऑफ मॉन्टेक्रिस्टो‘ या नावाचे इंग्रजी पुस्तक तुमच्या कुमारवयात अपरिहार्यपणे तुमच्या मनाच्या दारावर टकटक करत असते. या ठोठावण्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करता येतच नाही. हे पुस्तक तुम्हाला स्वतःकडे खेचते, मोहित करते, खिळवून ठेवते. वाचनाच्या तुमच्या एकूणच प्रवासात तुम्हाला मिळालेली ही अनमोल अशी भेट असते. अठरा वर्षाचा आपला वीरकथानायक चांडाळचौकडीच्या कारस्थानाचा बळी होऊन जन्मठेपेच्या शिक्षेत अडकला आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या कुठल्याशा पुराण्या किल्ल्यात कैदी म्हणून त्याची रवानगी झाली आहे. तो अन्यायाने अडकवलेला आहे आणि त्याची सुटका झाली पाहिजे, असे तुम्हालाही वाटते आहे. पुस्तक दोन्ही हातात घट्ट धरून, इंग्रजी भाषेशी लढा देत, तुम्ही या आपल्या वीरनायकाबरोबर त्या किल्ल्यावर अंधारकोठडीत जाऊन पडला आहात. येथे आलेला कैदी मेल्याशिवाय सुटूच शकत नाही अशी कुख्याती आणि अठरा वर्षाच्या उमद्या कथानायकाने तर अजून जगायला सुरूवातच केली नाही. तो सुटला पाहिजे असे आपलेही ठाम मत. किल्ल्यातली भुयारे, अंधार इत्यादी वातावरण आपल्या मनावर गारूड टाकायला लागलेले असते. अनपेक्षितपणे, दुसर्‍या एका वृद्ध आणि विद्वान अशा कैद्याशी आपल्या वीरनायकाची अकल्पित आणि अद्भुत अशी भेट होते. मग त्या कैद्याने त्याला दिलेले शिक्षण आणि गुप्त खजिन्याची दिलेली माहिती. वृद्ध कैद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कलेवरच्या जागी स्वतःला पोत्यात बंद करून आपल्या कथानायकाने करून घेतलेली सुटका, त्याचे समुद्रात फेकले जाणे, पोत्यातून बाहेर येणे आणि जीव वाचवणे, हे सगळे श्वास रोखून आपण वाचतो. सुटकेनंतर अफाट खजिन्याचा त्याने घेतलेला शोधही रोमहर्षक असतो, आपण सर्वस्व विसरून ते सगळे वाचतो आणि खजिना मिळाल्यानंतर आनंदित होतो. नंतर, श्रीमंत बनून-सरदार-‘काउंट’बनून आपल्या स्वतःच्या मूळ गावात त्याने प्रवेश करणे इत्यादी रोमहर्षक भाग कादंबरीच्या दुसर्‍या भागात येतो. त्याला अर्थात कोणी ओळखत नाही. पण आपला वीरनायक त्याला अडकवलेल्या चांडाळचौकडीचा शोध घेतो आहे. त्याला सूड घ्यायचा आहे.

पियूची वही

संगीता बर्वे यांनी लिहिलेले हे पुस्तक माझ्या हातात पडले आणि वाचताना आपण मोहून गेलो. बालसाहित्यातले हे श्रेष्ठ वर्गवारीतले पुस्तक आहे. म्हणजे, पालकांनी आपल्या मुलांना हे पुस्तक अवश्य भेट दिले पाहिजे. पियू ही इयत्ता आठवीतली मुलगी. म्हणजे बारा-तेरा वर्षांची. तिचा नंबर चोवीसावा आलेला आहे. ही बुद्धिमान मुलगी आहे आणि भोवतालच्या निसर्गाकडे ती अत्यंत सजग व जिवंत दृष्टीने बघते आहे. आपल्या घरातली एक छोटी खिडकी रंगवावी असे तिला वाटायला लागते आणि आईवडिलांच्या मदतीने खिडकी स्वच्छ करून, स्वहस्ते खिडकीचे गज पियू रंगवू लागते. त्या निमित्ताने त्या खिडकीला ओळख मिळते, ‘रंगीत खिडकी’या नावाने. मग या खिडकीत पियू मनीप्लांटची कुंडी ठेवते. गजाला धरून मनीप्लांट वाढायला लागतो. पियू या खिडकीजवळ आपला छोटासा टेबल ठेवते आणि येथे बसून ती बाहेरचे दृश्य पाहू लागते. हळूहळू सृष्टीत होणारे बदल, झाडावर येणारे पक्षी, त्यांची घरटी इत्यादी ‘नवलविश्व’ तिला उलगडू लागते. हे सगळे अनुभव पियू आपल्या डायरीमध्ये लिहिते आहे आणि लेखिकेने ही डायरीच आपल्याला वाचायला दिली आहे. पियूच्या लेखनातली निरागसता आपल्याला मोहित करते. या पुस्तकाचा दुसरा भाग संगीता बर्वे यांनी लिहावा असे आपण त्यांना सुचवणार आहे.

गोठण्यातल्या गोष्टी

हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेले हे पुस्तक रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे. यामध्ये गोठणे या काल्पनिक गावातल्या अनेक पात्रांच्या कथा सुरस पद्धतीने सांगितलेले आहेत. ही पात्रे प्रातिनिधीक आहेत आणि शोधली तर आपल्याही गावात सापडू शकतात. मनुष्यस्वभावाचे विलक्षण पैलू या सर्वच कथांमधून व्यक्त झालेले आहेत. ‘मालगुडी डेज्’ या पुस्तकातून जसा प्रयोग करण्यात आला होता, तसा प्रयोग या पुस्तकात केलेला असल्यामुळे श्रेष्ठत्त्वाच्या दिशेने जाणारे हे लिखाण आपल्याला मोहित करते. गोठणे हे गाव, त्यातले रस्ते, त्यातले चौक, तिथल्या इमारती हा सगळा नकाशा आणि हा सगळा भूगोल जिवंत होऊन आपल्या नजरेसमोर स्थिर होतो, खरा वाटायला लागतो. हेच लेखकाचे यश आहे. हे पुस्तक मिळवून वाचण्याची शिफारस मी करतो.

कथासरित्सागर

‘कथासरित्सागर‘ची भेट टाळता येतच नाही! उशिरा का होईना या ग्रंथाची जादू स्विकारावी लागते. या ग्रंथातून कोणी एक वीरनायक तुम्हाला भेटत नाही. कोणती एक गोष्ट तुम्हाला आठवत नाही. पण सगळा ग्रंथच वीरनायकाच्या स्वरूपात तुम्हाला दिलासा देण्यासाठी तुमच्या बरोबर वाटचाल करीत राहतो. विद्वान व्यासंगी, एकांतात जाण्यापूर्वी ‘महाभारत’व ‘कथासरित्सागर’ हे ग्रंथ सोबत रहावेत अशी इच्छा व्यक्त करतात असे नंतर वाचनात आले. रोमहर्षक वयातील सुरूवातीच्या वाचन-यात्रेत ‘कथासरित्सागर’सापडलेला असतो. या बृहतग्रंथाचे गारूड मनावर पडलेले असतेच. हे गारूड पुढच्या वाटचालीत तुमच्या सोबत आलेले असते. संशोधक या ग्रंथाबद्दल काय सांगतात हे नंतरच्या वयात वाचले तर चालते. उदाहरणार्थ, या ग्रंथात बुद्धोत्तर उल्लेख असल्यामुळे इसवीसनाच्या पहिल्या काही शतकातच या ग्रंथाच्या संकलनाची सुरूवात झाली होती असे म्हणतात. याच कथांनी जगभरच्या संकलनांना प्रेरणा दिली. अगदी अरेबियन नाईटस्ला सुद्धा असे म्हणतात. पण हे सगळे नंतर. तुमच्या कुमारवयातल्या आधीच्या वाचनात हा बृहतग्रंथ तुम्हाला प्रभावित करून गेलेला असतोच. मूळ कथा, त्या मूळ कथेची उपकथा, उपकथेची कथा आणि उपकथेची पुन्हा उपकथा अशी साखळी तुम्हाला गुंग करून टाकते.‘कथासरित्सागर’ चे खंड आहेत. हे खंड मिळवून चांगल्या वाचकाने वाचावेत अशी आपण शिफारस करीत आहे.

अरेबियन नाईटस्

‘अरेबियन नाईटस्’ नावाचा ग्रंथ भेटणे ही महत्वाची घटना. सन अठराशेच्या अखेरीस छापलेला, बारीक अक्षरातला दुर्मिळ असा मूळ ग्रंथ आमच्या घरीच होता, वडिलांच्या संग्रहातला. या ग्रंथाची जादू वेळोवेळी विस्तारत राहिली. पण या कथांमधून आपल्याबरोबर नेहमीच राहणारा असा कोणी वीरनायक मात्र सापडला नाही. कितीतरी एकाकी, आजारी आणि निराश अशा वाचकांना या ग्रंथाने वाचवले आहे, तारले आहे अशी नोंद माझ्या वाचनात आली आहे. यातली पात्रेच नाहीत तर हा ग्रंथच एखादा वीरनायक बनून आपल्या आयुष्यात येतो. गरजेनुसार, आपण या ग्रंथाचे बोटपकडायचे असते. नंतर तो ग्रंथ तुम्हाला अनोख्या दुनियेतून प्रवास करवून आणतो आणि हा न संपणारा प्रवास असतो. यातल्या कथा कुठून आल्या असतील याबाबत तुम्हाला त्या वयात काही कुतुहल असण्याचे कारण नसते. ग्रंथ उघडायचा आणि वाचायला लागायचे इतकेच तुम्हाला करायचे असते. पुढचे काम मग हा ग्रंथच करतो. तुम्हाला रमवतो, दिलासा देतो, प्रयत्नवादाचे महत्त्व सांगतो. संशोधक सांगताहेत की, पर्शियन कथांमध्ये या कथांचा उगम असावा किंवा त्याही पूर्वीच्या प्राचीन भारतीय कथांमध्ये त्यांचा उगम असावा. ख्रिश्चन व मुस्लिमांमध्ये दोन शतकभर रक्तरंजित धर्मयुद्ध झाले. या धर्मयोद्ध्यांनी युरोपमध्ये, सिसिलीमधल्या पार्लेमो येथील ‘मूरिश सेंटर्स ऑफ कल्चर’ पर्यंत किंवा ‘स्पेन’पर्यंत या कथा नेल्या असाव्यात असे संशोधकांचे म्हणणे आहे. काही असले तरी हा ग्रंथ आपल्यासोबत चालत राहतो. जागतिक साहित्याच्या प्रवासातील हा मैलाचा दगड आहे, याची आपल्याला त्या वयात जाणीव असण्याचे कारण नसते. मात्र, केव्हा तरी हा ग्रंथ मिळवून चांगल्या वाचकाने तो वाचला पाहिजे अशी शिफारस आपण करीत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply