दोन ठार तर अन्य किरकोळ जखमी
पोलादपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील कशेडी घाटामध्ये एकाच रात्री दोन वेगवेगळे अपघात झाले. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या पहिल्या अपघातात दोन जण ठार तर एक जखमी झाला.तर शनिवारी पहाटे झालेल्या दुसर्या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. दोन्ही अपघातात चार वाहनांची मोठ्या प्रमाणात मोडतोड होऊन हानी झाली आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील भोगाव जवळीत संत तुकाराम मंदिर शेजारी शुक्रवारी मध्यरात्री मुंबईकडून देवगड दिशेकडे जाणारी बोलेरो पिकअप (एमएच-07,एजे-2187) आणि जयगड येथून मुंबईकडे जाणारा ट्रक (एमएच-04,एफपी-2287) यांच्यात समोरासमोर ठोकर झाली. या अपघातात बोलेरो जीपमधील तुषार प्रकाश चव्हाण (वय 24, रा. नारिंग्रे, ता. देवगड) आणि निलेश मनोहर शेट्ये (वय 36, रा. मुंडगे, ता. देवगड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर उमेश उत्तम कोरडे (वय 24, रा. देवगड) यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताचे वृत्त समजताच कशेडी टॅप वाहतूक पोलीस शाखेचे उपनिरीक्षक ए. पी. चांदणे आणि सहकार्यांनी घटनास्थळी जाऊन अपघातातील दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. पोलीस हवालदार संदीप शिरगांवकर हे अधिक तपास करीत आहेत. त्यानंतर शनिवार पहाटे सव्वाचार वाजण्याच्या सुमारास इको कार व आयशर टेम्पो यांचा अपघात झाला. चालक कासीम युसुफ बोट (वय 49, रा. सुरळ, ता. गुहागर) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच-08,एम-1298) चालवत विक्रोळी येथून चिपळूणकडे जात होता. कशेडी घाटात टेम्पोचा जॉईंन्ट तुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. व टेम्पोने त्याच्यापुढे जाणार्या इको कार (एमएच-03,झेड-2484) ला जोराची धडक दिली. त्यामुळे इको गाडी चालक हेमंत दत्ताराम ब्रीद (वय 21, रा. तांबेडी, सध्या रा. कुंवारबाव, ता. जि. रत्नागिरी) याच्यासह कार रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील इसमांना कोणत्याही प्रकारच्या दुखापती झालेल्या नाहीत. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आल्याची माहिती कशेडी टॅप वाहतूक पोलीस शाखेचे उपनिरिक्षक ए. पी.चांदणे यांनी दिली.