Breaking News

राज्यस्तरीय तायक्वांदो पुमसे स्पर्धेत रायगडला सांघिक अजिंक्यपद

मोहोपाडा : प्रतिनिधी
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने अहमदनगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्हा संघाने एकूण 21 पदके मिळवून 1931 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध वयोगटांमधील सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सब-ज्युनिअर, कॅडेट, ज्युनिअर व सीनिअर अशा वयोगटांत वैयक्तिक पुरुष व महिला, मिश्र जोडी तसेच सांघिक पुरुष व महिला असे एकूण 33 गट होते. नवी मुंबई व रायगडच्या खेळाडूंनी 21 विविध गटांमध्ये रायगड जिल्ह्यातर्फे सहभाग घेतला होता. यामध्ये खेळाडूंनी 14 सुवर्ण, तीन रौप्य व चार कांस्यपदकांसह एकूण 21 पदके मिळवून रायगडला सांघिक विजेतेपद प्राप्त करून दिले.
स्वराली माटेकर हिने सब-ज्युनिअर वैयक्तिक मुलींच्या गटात सुवर्णपदक पटकावून स्पर्धेची सुरुवात, तर अमोल माळीने 40 वर्षाखालील वैयक्तिक पुरुष गटात सुवर्णपदक जिंकून सांगता केली. रोहित सिनलकर व प्रथम ठोंबरे यांनी प्रशिक्षक म्हणून आणि हुसेन शेख व निखिल ठुबे यांनी व्यवस्थापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली. यातील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंची राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली असून त्या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
प्रशिक्षक रोहित सिनलकर यांची 19 ते 21 जानेवारीदरम्यान तामिळनाडूतील नमक्कल येथे होणार्‍या राष्ट्रीय पुमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.
विजेत्या संघातील खेळाडूंचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, नवी मुंबईचे माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह नवी मुंबई मनपा विस्तार अधिकारी सुलभा बारघरे, मुख्याध्यापक मारुती गवळी, अमॅच्युअर तायक्वांदो असोसिएशन ऑफ रायगडच्या अध्यक्ष अ‍ॅड. प्रज्ञा भगत, सचिव सचिन माळी, उपाध्यक्ष संजय भोईर, खजिनदार रोहित सिनलकर आदींनी अभिनंदन केले, तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply