पनवेल : वार्ताहर
पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या सर्कलजवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे चार पिस्तुल व चार जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2ला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून गोपाल राजपाल भारद्वाज (वय 22, रा. नवोदय नगर, टेहरी, उत्तराखंड) याला अटक करण्यात आली आहे.
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात एक व्यक्ती अनधिकृतपणे गावठी बनावटीचे अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 2 चे प्रवीण फडतरे यांना मिळाली. याची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांना दिली. त्यानुसार पनवेल एसटी स्टँड परिसरात सापळा रचण्यात आला. याच दरम्यान एक इसम पाठीवर काळ्या रंगाची बॅग घेऊन रेल्वे स्टेशनकडून सर्कलकडे पायी चालत येत असताना दिसला. या वेळी तो व्यक्ती रिक्षेला हात करत होता. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याचे नाव गोपाल राज्यपाल भारद्वाज असे आहे. त्याच्या बॅगची पाहणी केली असता त्यात चार गावठी बनावटीचे पिस्तुल व चार जिवंत काडतुसे मिळून आली व खिशात मोबाइल सापडला. हे पिस्तुल त्याने कुठे, कोणाला विक्री करणार होता याची अधिक माहिती पोलीस घेत आहेत.