Breaking News

युद्ध आमुचे सुरू

महाराष्ट्रातील सत्तापालट होऊन जवळपास निम्मे वर्ष उलटले तरी शिवसेना कोणाची या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळू शकलेले नाही. अर्थात, या प्रश्नाचे उत्तर कायद्याच्या चौकटीत राहूनच शोधायचे आहे. जनतेच्या मनातदेखील हे उत्तर स्वच्छपणे प्रतिबिंबित झालेले दिसेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हीच खरी शिवसेना आहे असा दावा शिंदे-समर्थक आत्मविश्वासाने करत असतात, तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हा गट म्हणजेच अस्सल शिवसेना असा दावा ठाकरे-समर्थकांच्या गोटातून होताना दिसतो. अर्थात ठाकरे-समर्थकांच्या गटामध्ये आता फार थोडे आमदार-खासदार उरले आहेत. बहुतेकांनी शिंदे यांच्या छावणीतच इनकमिंग केले असून हा ओघ अजुनही चालू आहे. संख्येचा विचार करता शिंदे-समर्थकांचे पारडे प्रथमदर्शनी जड दिसते यात शंकाच नाही, परंतु भावनिक मार्गाने हा प्रश्न सुटणारा नाही. घटनेच्या आणि कायद्याच्या चौकटीतच त्याचे उत्तर शोधावे लागेल. या प्रश्नाची उकल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ तसेच केंद्रीय निवडणूक आयोग समर्थ आहे. निवडणूक आयोगासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांतर्फे मंगळवारी युक्तिवाद झाले. ही सुनावणी अपूर्ण राहिली असून येत्या शुक्रवारी धनुष्यबाणाबाबत पुढील सुनावणी होईल. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गेल्या पोटनिवडणुकांच्या वेळेस तात्पुरते गोठवण्यात आले होते. त्याऐवजी ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे-समर्थकांना ढाल-तलवार ही चिन्हे मिळाली होती. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिवसेनेच्या प्रतिष्ठेचे प्रतीक बनले आहे. ते कोणाकडे जाते, यावर महाराष्ट्राचे राजकारण बरेचसे अवलंबून राहील. निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेनेतील फूट ही निव्वळ कल्पना असल्याचे त्यांनी ठामपणाने सांगितले. सिब्बल यांच्या शब्दांतच सांगायचे झाले तर, शिवसेनेतील फूट आणि शिंदे समर्थकांचा गट हे फॅक्शन नसून फिक्शन आहे. खरी शिवसेना अजुनही उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली अबाधित असून काही आमदार बाहेर गेल्यामुळे पक्षाला काहीच फरक पडलेला नाही असा दावा सिब्बल यांनी युक्तिवादाच्या वेळी केला. शिंदे-समर्थकांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये देखील प्रचंड तुटी असून राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचे अस्तित्व कायम आहे अशा आशयाचा युक्तिवाद त्यांनी केला. अर्थातच शिंदे-समर्थकांची बाजू लढवणारे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचा युक्तिवाद ताबडतोब खोडून काढला. पक्षातील फूट कपोलकल्पित असेल तर त्यानंतर घडलेल्या बर्‍याच घटना अवास्तव मानाव्या लागतील. ठाकरे-समर्थकांच्या गटात पक्ष फारसा उरलाच नसून नेते व कार्यकर्त्यांची बहुसंख्या शिंदे समर्थक गटाकडेच असल्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह त्यांनाच मिळायला हवे असे जेठमलानी यांनी अनेक दाखले देत सांगितले. भूतकाळातील काही राजकीय घटनांचा दाखलादेखील त्यांनी या वेळी दिला. जेठमलानी यांच्या युक्तिवादावर अधिक टिप्पणी करण्यासाठी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अधिक वेळ मागून घेतला. त्यानुसार पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय घेऊ नये, अशी विनंती ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. याउलट लवकरात लवकर निर्णय द्यावा हा शिंदे-समर्थकांचा आग्रह आहे. चिन्हासंदर्भात योग्य तो निकाल कोर्टकज्ज्यांमधून यथायोग्य वेळी लागेलच. जनतेच्या मनातील सरकार मात्र यापूर्वीच राज्यामध्ये सत्तेवर आले आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply