![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/05/Karnala-Abhayaranya4-1024x512.jpg)
पनवेल : वार्ताहर
कर्नाळा अभयारण्यातील पक्षी, प्राण्यांची गणना करण्यात आली. या गणनेत 37 प्रजातीचे प्राणी आणि पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या गणनेत 41 प्रकारच्या प्रजातींची नोंद झाली होती. पक्षी गणनेसाठी लावण्यात आलेल्या कॅमेर्यात बिबट्याचे दर्शन घडले नसले, तरी या अभयारण्यात नियमित वावर असल्याचा दावा कर्नाळा अभयारण्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी केला आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्यात भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रानकोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षी मोठ्या प्रमाणात आहेत. सुमारे 12.155 चौरस किलोमीटरच्या परिसरात असलेल्या या अभयारण्यात स्थानिक, तसेच स्थलांतरित 147 प्रजातीचे पक्षी राहतात. यात 37 प्रकारच्या स्थलांतरित पक्ष्यांचाही समावेश आहे. हिंस्र प्राण्यांचाही या ठिकाणी अधिवास असल्याचे समोर आले आहे. कर्नाळा अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. गेल्या वर्षी सुमारे 88 हजार पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली होती. या अभयारण्यातील प्राण्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी येथे कॅमेरे सुरू ठेवण्यात आले होते.