Breaking News

एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी ; 30 मे रोजी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाच्या पार्श्वभूमीवर सरकार स्थापनेसाठी दिल्लीतील संसद भवनात  काल बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली, तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिले. मोदींनी आज रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. येत्या दि. 30 मे रोजी मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

शिरोमणी अकाली दलाचे प्रकाश सिंग बादल, एलजेपीचे नेते रामविलास पासवान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह इतर घटक पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या एनडीए नेतेपदाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. देशाच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन दिल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्यांचे आभार मानून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छाही दिल्या.

या वेळी बोलताना अमित शहा यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत सत्तेच्या काळात सबका साथ, सबका विकास याच धर्तीवर देशातील लोकांची सेवा केली. यंदा लोकांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक विजय एनडीएला दिला आहे. 1971नंतर देशात पाच वर्षे पूर्ण करून सलग दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे नेते आहेत. जनतेचा कौल मोदींना मिळालेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. जनतेचा मिळालेला अभूतपूर्व कौल लोकशाही मजबूत करणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

– संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी नव्या-जुन्या खासदारांना काही टिप्स दिल्या. ते म्हणाले की, ‘सेवाभावी’ लोकांपासून दूर राहा. अहंकारापासून स्वतःला दूर ठेवा. माहिती घेऊन मगच बोला. छापून येणे आणि बोलणे याबाबत जबाबदारीचे भान बाळगा. जुन्या खासदारांकडची माणसे स्वतःच्या सेवेत घेऊ नका. तुमच्या गावातील लायक माणसाची याकामी निवड करा. खासदारानेही रांगेत उभे राहिले पाहिजे आणि स्वतःची सुरक्षा तपासणी करू दिली पाहिजे. या वेळी पंतप्रधानांनी माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचीही आठवण काढली.

– नरेंद्र मोदी संविधानासमोर नतमस्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय दलाच्या नेतेपदी निवड करण्यात आली असून निवड झाल्यानंतर मोदी हे संसदीय सभागृहातील संविधानासमोर नतमस्तक झाले. भारताच्या लोकशाहीला आपल्याला समजून घ्यावे लागेल. भारतातील मतदारांना तुम्ही कोणत्याही मापदंडात मोजू शकत नाही. सत्तेच्या मानसिकतेचा मतदार स्वीकार करीत नाहीत, असे मोदींनी म्हटले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply