Breaking News

दैवी स्वराची नव्वदी

हजारो लोकप्रिय गीते गाणार्‍या लतादीदींचे नाव 1974 सालीच सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणार्‍या गायिका म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले. भारतीय चित्रपटसंगीतातील त्यांचे योगदान निश्चितच अतुलनीय असेच असून त्यांच्या स्वरांची मोहिनी येणारी आणखी कितीतरी दशके भारतीय मनांवर अधिराज्य गाजवत राहील याविषयी तिळमात्र शंका नाही.

गेली सात दशके लाखो भारतीयांच्या भावविश्वाला ज्या दैवी स्वराने समृद्ध केले, जो अलौकिक स्वर देशाविदेशात वास्तव्य करणार्‍या भारतीयांचे कान-मन तृप्त करीत त्यांचे रंजन करीत आला, तो दैवी स्वर लाभलेल्या ख्यातनाम गायिका लता मंगेशकर या शनिवारी, 28 सप्टेंबर रोजी नव्वद वर्षांच्या होत आहेत. लताजींच्या समधुर आवाजाच्या आनंदडोहात तरंगण्याच्या अनुभवाने सदोदित तृप्त होणारे त्यांचे जगभरातील चाहते, नजीकचे नातेवाईक आणि चित्रपटसृष्टीतील मित्रमंडळी तर त्यांच्या या विशेष वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी उत्सुक आहेतच. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही लताजींचे प्रचंड चाहते आहेत. लताजींचा आवाज हा देशाचा अमूल्य ठेवा आहे. लताजींचा सन्मान हा जणु या देशाच्या सर्वश्रेष्ठ कन्येचाच सन्मान आहे. त्यामुळेच लताजींना त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवशी ‘डॉटर ऑफ द नेशन’ असा किताब अधिकृतपणे देऊन त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. 1942 पासून वयाच्या अवघ्या 13व्या वर्षापासून लतादीदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन करीत आल्या आहेत. त्यांची असंख्य चित्रपटगीते तर अजरामर आहेतच, परंतु 1962 च्या भारत-चीन युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्याकरिता लिहिले गेलेले त्यांचे ‘ऐ मेरे वतन के लोगों’ हे गीतही राष्ट्रगीतापाठोपाठचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रभक्तीपर गीत मानले जाते. हे गीत त्या पहिल्यांदा नवी दिल्लीतील कार्यक्रमात गायल्या, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे देखील डोळे पाणावले होते. आणि आजही या गीतातील लतादीदींच्या स्वराने आपल्यापैकी अनेकांचा कंठ दाटून येतो. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक योगादानाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच त्यांना ‘डॉटर ऑफ द नेशन’ या किताबाने सन्मानित केले जाते आहे. देशाने यापूर्वी 1989 साली ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देऊन तर 2001 साली ‘भारतरत्न’ किताबाने त्यांचा सन्मान केला आहे. त्याखेरीज तीन राष्ट्रीय पुरस्कार, पद्मभूषण, पद्मविभूषण या पुरस्कारांनी देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नव्वदीच्या उंबरठ्यावरच्या लतादीदी आजही अतिशय कार्यरत आहेत हे अनेक जण जाणतात. सध्या देखील पुढील महिन्यातील एका रेकॉर्डिंगच्या तयारीत त्या व्यस्त आहेत असे त्यांचे कुटुंबीय सांगतात. यंदा त्यांचा वाढदिवस सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आला आहे. लतादीदी अंधविश्वासू नसल्या तरी सर्वपित्री अमावस्येचा दिवस हा पूर्वजांच्या स्मरणात, शांतपणे व्यतीत करण्याचा दिवस असल्याचे त्या मानतात. त्यामुळे वाढदिवसाचा घरगुती सोहळा रविवारी साजरा होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या भगिनी मीना खडीकर लिखित मराठी पुस्तकाचा हिंदी अनुवाद ‘दीदी और मै’ याचे प्रकाशन होईल. त्यांचे लाडके धाकटे बंधू, प्रतिभावान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी निरनिराळ्या निमित्ताने लतादीदींबद्दल लिहिलेल्या लेखांचे संकलनही यादिवशी पुस्तक रूपाने प्रकाशित केले जाईल.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply