पंढरपूर : प्रतिनिधी
कोरोना संकटामुळे गेल्या 17 मार्चपासून कुलुपात बंद असलेल्या विठूरायाच्या मंदिराची दारे कार्तिकी यात्रेला उघडावीत आणि कमीत कमी निर्बंध घालून यंदा कार्तिकी यात्रा होऊ द्यावी, अशी मागणी रविवारी (दि. 8) वारकरी संप्रदायाच्या बैठकीत करण्यात आली. आषाढीप्रमाणे कार्तिकी यात्रेला पंढरपूर शहरात संचारबंदी लागू न करता मर्यादित वारकर्यांना कोरोनाचे नियम पाळून येऊ द्यावे. प्रत्येक मठात 50 भाविकांना उतरण्यास परवानगी द्यावी आणि कार्तिकी एकादशीला सकाळी 12 वाजेपर्यंत वारकर्यांना सोशल डिस्टन्स पाळून प्रदक्षिणा करू द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात केली जाणार आहे. विठ्ठल मंदिर गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने कार्तिकी एकादशीला मंदिराची सर्व दारे उघडावीत आणि भाविकांना मंदिराबाहेरून देवाचे दर्शन घेता यावे, अशीही मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. शासनाने आषाढी यात्रेप्रमाणेच कार्तिकी यात्रेवर निर्बंध घातल्यास वारकरी संप्रदाय येणार्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकेल, असा इशाराही वारकरी संप्रदायाच्या बैठकीत देण्यात आला आहे.
थकीत वेतनासाठी एसटी कर्मचार्यांचे आज राज्यव्यापी आक्रोश आंदोलन
मुंबई : एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचार्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेचे सोमवारी (दि. 9) राज्यभर आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होणार्या कर्मचार्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे पत्रक एसटी प्रशासनाने जारी केले आहे. दरम्यान, कामगार करार आणि वेतन प्रदान कायद्याचा भंग केल्याबाबत औद्योगिक न्यायालयात दावा ठोकणार असल्याचा इशारा एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिलाय, तर दुसरीकडे एसटी कर्मचार्यांना वेळेत वेतन मिळावे, थकीत तीन महिन्याचे वेतन मिळावे यासाठी इंटकने एसटी प्रशासनाविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली आहे.