नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबई महानगर पालिकेच्या सहकार्याने नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर तर्फे रविवारी (दि. 3) एपीएमसीमधील फळ बाजारात 2086 कर्मचार्यांची मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली.
मुंबई व लगतच्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून नवी मुंबईतील बाजार समितींमध्ये अनेक व्यापारी व मजुरांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे. शेतात पिकविलेल्या भाज्या -फळे व इतर उत्पादने नाशवंत असतात व हा माल ग्राहकांपर्यंत पोहचला नाही तर शेतकर्यांचे नुकसान होते याच जाणीवेतून आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या बाजार समित्यांचा कारभार सुरु ठेवला असून एकूण माथाडी कामगारांपैकी 40 टक्के कामगार सध्या उपस्थित राहत आहे व या कामगारांना कोरोनाची लागण होऊ नये अथवा जर त्याना लागण झाली असेल तर ती लवकर कळावी यासाठी एपीएमसीमधील फळ बाजारात कर्मचार्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली.
तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळलेल्या कामगारांची नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयातर्फे कोरोना तपासणी करण्यात आली. या वेळी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या 25 जणांच्या टीमने पीपीई ड्रेस परिधान केले होते. सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत येथील माथाडी कामगार व इतर कर्मचार्यांची प्राथमिक तपासणी केली. बाजार समित्यांमध्ये माथाडी कामगारांशिवाय शेतातून आलेला माल उतरवता येणार नाही परंतु यासोबतच त्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. याच भावनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली ही तपासणी फळ बाजारात केली गेली.
या वेळी नवी मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातर्फे नोडल ऑफिसर डॉ. मुस्तफा झकारिया, मेडिकल ऑफिसर डॉ. अजय पाटील, साहाय्यक मेडिकल ऑफिसर डॉ. दीपाली लुंगरे व सॅनिटायजेंशन अधिकारी डॉ. दीपक आवटे उपस्थित होते तसेच तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलची निष्णांत डॉक्टरांची टीम सुद्धा उपस्थित होती.