पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – केंद्र सरकारने 3 मे रोजीचा लॉक डाऊन संपल्यावर पुन्हा 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला. पण या वेळी काही सवलती देण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामध्ये देशातील दारूची दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे सोमवार (दि. 4) पासून दुकाने उघडणार म्हणून आनंदात असलेल्या पनवेलमधील तळीरामांनी सकाळपासूनच दारुच्या दुकानासमोर गर्दी केली होती. मात्र, दारूची दुकाने न उघडल्याने त्यांची घोर निराशा झाली.
सरकारने जिल्हानिहाय रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन जाहीर केले. या झोनना वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या. यामध्ये तिन्ही झोनमध्ये दारूची दुकाने उघडण्यासाठी सशर्त परवानगी देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोमवारी वाईन शॉप समोर तळीराम लाईन लावून उभे राहिले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा ही फज्जा उडाला होता. सकाळचे 11 वाजले तरी दुकान न उगडल्याने त्यांच्यात चुळबुळ सुरू झाली. तळीरामांची गर्दी वाढत होती. पण दुकान काही उघडलेच नाही. त्यामुळे त्यांची निराशाच झाली. पनवेल तालुक्यात वाईन्स शॉपवाल्यांना उत्पादन शुल्क खात्यानेरीतसर परवानगी दिल्याशिवाय तसेच कलेक्टरकडून राज्य उत्पादन शुल्क विभागास आदेश मिळाल्याशिवाय वाईन्स शॉप खुले होणार नसल्याचे समजते.
उरणमध्ये मद्यप्रेमींची घोर निराशा
उरण : प्रतिनिधी – राज्याच्या काही ठिकाणच्या शहरातील देशी दारूची दुकाने उघण्यात आल्याचे टिव्हीच्या बातम्यातुन पाहिल्यानंतर वाईनशॉप सुरू होण्याचे आदेश शासनाकडून नसतांनाही तळीरामांनी मद्य खरेदीसाठी उरण शहरातील राजपाल व सह्याद्री वाईनशॉप समोर मोठी गर्दी केली होती.
सकाळी 8 वाजल्यापासून उरण शहरातील वाईनशॉप समोर जणू काही यात्रा भरली होती. उरण शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत एक-एक दिवसांनी वाढ होत असून, त्याचे गांभिर्य येथील नागरिकांकडून घेतले जात नाही. बाजारपेठेत सोशल डिस्टनचा तर अगदी फज्जाच उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मोठ्या अपेक्षेने उभे असलेल्या तळीरामांनी वाईनशॉप सुरू होतील, या आशेने 11 वाजेपर्यंत तळपत्या उन्हातच तब्बल तीन तास उभे राहणे पसंत केले होते.
मात्र उन्हाचा पारा अधिक चढू लागल्याने तळीरामांच्या कपाळावरून घामाच्या धारा वाहू लागल्याने आत्ता काही खरे दिसत नसल्याचे चित्र पाहून गेल्या दोन महिन्यांच्या प्रदीर्घ अवधीनंतर तरी जिभेखाली न गेलेल्या अमृताचा घोट पोटात जाईल याचा अपेक्षा भंग झाल्याने एक – एकाने वाईनशॉप समोरून माघारी जाणे पसंद केले. 11 वाजल्यानंतर या देशी दारू विक्रीच्या बंद असलेल्या दुकानासमोरून गर्दी कमी होण्याला मदत झाली.
नवी मुंबईतही दारु खरेदीसाठी रांगा
नवी मुंबई : बातमीदार – सोमवारी सकाळपासूनच नवी मुंबईतील ठिकठिकाणच्या वाईन शॉपसमोर तळीरामांनी रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच अत्यावश्यक सेवांमध्ये दिलेल्या सवलतीत देखील काही सुज्ञ नागरिकांकडून बेशिस्तपणा निदर्शनास येऊ लागल्याने पालिका व पोलीस प्रशासन हतबल झाले आहे. त्यात मद्यविक्रीस परवानगी दिल्यास या बेशिस्तपणात वाढ होऊन कोरोनाचा धोका वाढण्यास मदत होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत अखेर नवी मुंबई पालिका आयुक्तांनी दुकाने खुली करण्यास नकार देत बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील तळीरामांची चिंता वाढली आहे.
दारूची दुकाने सुरु होणार या आशेने तळीरामांनी गर्दी केली होती. अखेर नवी मुंबई पोलीसांनी कठोर पवित्रा घेतला असून, दारुसाठी गर्दी करणार्यांना आणि दारुच्या दुकानासमोर पोलिसांकडून देखील प्रसाद मिळाला. तर तळीरामांची ही अवस्था पाहून अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडलेल्या सामान्य नागरिकांचे मात्र मनोरंजन झाले.
मुंबई, ठाणे क्षेत्रात दारू विक्री सूरु झाल्याने नवी मुंबईत त्याचा छुप्या मार्गाने काळा बाजार होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन असतानाही छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याचे अनेक ठिकाणी उघड झाले होते. त्यामुळे आता तर थेट सरकारने परवानगी दिल्याने या छुप्या पद्धतीने विक्रीत वाढ होण्याची शक्यता असून पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.