लॉकडाऊनसह चक्रीवादळाचा कहर; लाखोंचे नुकसान
पाली ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन महिन्यांहून अधिक काळ जारी असलेल्या लॉकडाऊनमुळे रोपवाटिकेतील रोपांची विक्री होत नाही. कामाला माणसे नाहीत. हाताशी नवीन काम नाही. त्यातच पाणी नसल्यामुळे रोपे टिकविताना अनेक अडचणी येत आहेत. आता पावसाला सुरुवात झाली असताना खते आणि नवीन रोपे आणायची कुठून? या चिंतेत जिल्ह्यातील रोपवाटिकाधारक व लँडस्केप व्यावसायिक असतानाच निसर्ग चक्रीवादळामुळे या व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याने कंबरडे मोडले आहे.
मार्चमध्ये आणलेली रोपे व झाडे लॉकडाऊनमुळे विकली गेली नाहीत. मग ही झाडे टिकविताना अडचणी येत आहेत. यातील बरीचशी रोपे मोठी व बिनकामाची झाल्याने त्यांची विक्रीदेखील होणे कठीण आहे. तसेच चक्रीवादळामुळे रोपवाटिकाधारकांना लाखोंचे नुकसान सहन करावे लागत आहे. सर्व रोपे व झाडे अक्षरशः वाहून आणि उडून गेली आहेत.
पावसाळा सुरू झाल्यावर सर्वत्र रोपवाटिका सजतात, मात्र हाती पैसा नाही. वाहतूक बंद तसेच शोभीवंत, फळे आणि फुलझाडांच्या रोपांचा व खतांचा तुटवडा भेडसावण्याची व किंमती वाढण्याची शक्यता आहे.
हंगाम निसटला?
पावसाळ्यात बागायतदार आणि काही खासगी मालक आपल्या बागेत व परिसरात फळझाडे व फुलझाडे लावतात. जून महिन्यापासूनच रोपवाटिकाधारक पूर्ण तयारीनिशी असतात. यादरम्यान लँडस्केपिंगची कामेदेखील जोरात असतात. यामध्ये गार्डन किंवा बाग तयार करणे, शोभिवंत झाडे लावणे अशा विविध गोष्टी येतात, मात्र लोकांकडे पैसे, कामासाठी माणसे आणि साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे चक्रीवादळामुळे रोपवाटिकाधारकांचा हक्काचा पावसाचा हंगाम हातून निसटण्याची चिन्हे आहेत.
तीन महिन्यांपासून फक्त पाणी मारून झाडे मोठी केली आहेत, पण विक्री नाही. हाती नवीन कामे नाही. गावातून मजूर यायला गाड्या नाहीत. खते व औषधांचा तुटवडा होईल. पाऊस सुरू झाल्याने माती व शेणखतही मिळत नाही. चक्रीवादळामुळे खूप नुकसान सोसावे लागले. नवीन रोपे आणायलादेखील हाती पैसे नाहीत.
-अमित निंबाळकर, ग्रीन टच लँडस्केप अॅण्ड नर्सरी, पाली
लॉकडाऊन व चक्रीवादळामुळे विक्रीसाठी झाडे आणणे मुश्कील झाले आहे. जी झाडे उपलब्ध होती त्यांची मोडतोड झाली आहे. जी काही झाडे शिल्लक आहेत त्या झाडांची विक्री करायला ग्राहक मिळाले पाहिजेत. इतर बागकामेदेखील बंद आहेत. चक्रीवादळामुळे नवीन कामे मिळणे कठीण झाले आहे. परिणामी आर्थिक विवंचना वाढली आहे.
-श्रद्धा घाग, नर्सरी व्यावसायिक