चीनने सीमेवर केलेली आगळीक आता त्यांच्याच अंगास येऊ लागली आहे. चीनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारताने सीमेवरील हिंसक संघर्षानंतर चिनी मालावर बहिष्कार टाकत स्वदेशीचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे या निर्णयाबद्दल अभिनंदन केले पाहिजे. सरकारने चांगले पाऊल उचलले आहे. नागरिकांनीही सरकारला साथ देत शहीद जवानांच्या बलिदानाचा बदला घेतला पाहिजे.
शेजारी देश पाकिस्तानच्या कुरापती कमी म्हणून की काय आता चिनी ड्रॅगनचा फुत्कारही वाढू लागला आहे. तसेही पाकिस्तानप्रमाणे चीनने आपला काही भाग यापूर्वीच बळकावला आहे. त्यांची हाव आणखी वाढत चालली असून, त्यांनी नेपाळलाही फूस लावल्याचे चित्र आहे. म्हणूनच नेपाळने नुकताच भारताचे काही भाग आपल्या नकाशात दाखविण्याचा आगाऊपणा केला आहे. महासत्ता म्हणून चीनचा उदय होत असताना दुसर्यावर अन्याय करून, दुसर्यांच्या कुरापती काढून, हिंसा करून मोठेपण मिळविण्यात काय मतलब. आधीच कोरोनामुळे चीनचे कंबरडे मोडले असून, ही महामारी त्यांनी संपूर्ण जगात पसरविली आहे. अशा वेळी शांत राहायचे सोडून ते मुजोरी दाखवत आहेत. त्यामुळे या चिनी ड्रॅगनची नांगी ठेचायची वेळ आली आहे. चीनने भारताशी लडाख सीमेवर गलवान खोर्यात आगळीक केल्यानंतर संपूर्ण भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या भीषण झटापटीत 20 भारतीय सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. वेळ आली तर सीमेवर भारतीय सैनिक बुलेटने चिनी सैनिकांशी दोन हात करतीलच, पण आपण व्हॉलेटने चीनसोबत लढू शकतो आणि चीनचा आर्थिक कणा मोडू शकतो. याची प्रचिती आता येण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांकडून ‘बॉयकॉट चीन’चा नारा दिला जातोय. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरत असते. ते लक्षात घेऊन चीनची आर्थिक कोंडी केल्यास त्यांचे डोके ठिकाणावर येईल. त्या दृष्टीने आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सरकारी पातळीवर चिनी उत्पादनांचा वापर थांबविण्याचे आदेश केंद्र स्तरावर देण्यात आले आहेत. आता खासगी कंपन्यांनीही चिनी वस्तूंवर बंदी आणून त्यांचा बाजार उठविला पाहिजे. मुंबईतील मोनोरेलसाठीचे चिनी कंपनीला दिलेले अंतिम टप्प्यातील कंत्राट एमएमआरडीएने रद्द केले आहे. आता अन्य आस्थापना तसेच मुख्य म्हणजे खासगी कंपन्यांनी चीनला धडा शिकविण्याचा निर्धार करायला हवा. हीच वेळ आहे आपल्या जवानांना मारणार्या गनिमाला चोख प्रत्युत्तर देण्याची. यानिमित्ताने स्वदेशी उत्पादनांनाही बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. आपला देश सुजलाम् सुफलाम् आहे. पूर्वी आपल्या देशात बारा बलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. गावकर्यांना लागणार्या सर्व चीज-वस्तू गावातच उपलब्ध होत असत. त्यातून सर्वांना रोजगार मिळत असे. ही साखळी देशांतर्गत सुरू करता येऊ शकते. आपल्या देशात गुणवत्ता ठासून भरली आहे. सर्व काही तयार करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. नाही तो फक्त विश्वास. आपण आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला तयार नाही. इतर देशांची उत्पादने आपण अधिक किंमत मोजून घेतो आणि तुलनेने स्वस्त असूनही देशी वस्तू नाकारतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे. परिवर्तनातून समृद्धी आणण्याची आतासारखी चांगली वेळ नाही. चिनी ड्रॅगन माजला आहे. त्याला सर्व देशवासीय मिळून अनोख्या पद्धतीने ठेचू या!