Breaking News

जंजिरा किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत

मुरूड : प्रतिनिधी

सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. मुरूड तालुका प्रवासी संघटनेच्या प्रयत्नाने किल्ल्यावरील गाइड व्यवस्था पूर्ववत झाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे. जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे साडेपाच लाख पर्यटक मुरूडला येतात. चारही बाजूने समुद्र व खारट पाणी असतानादेखील या किल्ल्यात दोन गोड्या पाण्याचे तलाव असल्याने येथे कधीही पाणीटंचाई भासत नाही. या ऐतिहासिक किल्ल्याचे महत्त्व आणि महात्म्य फार मोठे आहे, मात्र त्याची माहिती देणारी गाइड व्यवस्था काही दिवसांपासून बंद करण्यात आली होती. त्यामुळे पर्यटकांना किल्ल्याविषयी माहिती मिळत नव्हती. गाइड बंद केल्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळणे बंद झाले होते. गाइड व्यवस्था बंद केल्याचे समजताच मुरूड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी थेट किल्ल्याचे परिचारक प्रकाश गोगरे यांची भेट घेतली व पर्यटकांना पुन्हा गाइड उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. त्या वेळी तेथे असणार्‍या पर्यटकांनीसुद्धा आम्हाला गाइड आवश्यक असल्याची मागणी उचलून धरली. त्यानंतर प्रकाश गोगरे यांनी गाइड व्यवस्था पुन्हा सुरू करण्याचे मान्य केले व गाइडबाबतच्या तक्रारी पुन्हा येता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जंजिरा किल्ल्यावर असणारे गाइड पर्यटकांकडून मोठी रक्कम आकारत होते. त्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने येथील गाइड व्यवस्था बंद करण्यात आली होती. पर्यटक व प्रवासी संघटनेने मागणी केल्यावरून सदरची व्यवस्था पूर्ववत करीत आहोत, मात्र गाइडबाबतच्या तक्रारी पुन्हा येता कामा नये.

-प्रकाश गोगरे, परिचारक, जंजिरा किल्ला, मुरूड

जंजिरा किल्ल्यातील गाइड चांगली सेवा देत आहेत. फक्त ती सेवा मराठीत असावी, तसेच गाइड यांनी या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास सांगितला पाहिजे.

-प्रफुल दवे, पर्यटक, चर्नी रोड, मुंबई

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply