Breaking News

लॉकडाऊन काळात पक्ष्यांचा मुक्त विहार

उरण ः प्रतिनिधी

तळपत्या उन्हानंतर आता उरण तालुक्यात पावसाळा सुरू होऊन एक महिना 22 दिवसांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली, तर काही दिवस कोरड्या उन्हाचे  गेले असून जुलै महिन्यात मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली आहे. ऊन असो की पाऊस विशेषतः ग्रामीण भागातील गावातील घराशेजारी असलेल्या विविध प्रकारच्या झाडांवर विविध जातींचे आकर्षक पक्षी नेहमीच घराच्या खिडकीतून नजरेस पडतात. गावाकडील घराभोवती असलेल्या आंबा, चिंच, कडूलिंब, वड, पिंपळ, करंज, ताड- माड, गुलमोहर, काट सावरीचे झाड, नारळी, पोफळी आदी झाडांच्या फांद्यांवर हे आकर्षक पक्षी स्वच्छंदपणे बागडताना खिडकीतून नेहमीच सहजरीत्या दृष्टीस पडतात. सूर्यपक्षी सहचारिणीसोबत फुलातील मध चोचीने गोळा करताना दृष्टीस पडतात, तर चित्रांगसारखे भांडखोर पक्षीही नजाकतीने दिसतात. काही जातीचे पक्षी थव्याथव्याने विहार करताना आढळतात.

     काही जातीच्या पक्ष्यांचा रंग सभोवतालच्या परिस्थितीशी जुळणारा असतो. त्यामुळे असे पक्षी चटकन नजरेला दिसत नाहीत. मोकळ्या किंवा दाट झाडाझुडपांतही विविध रंगी बहुढंगी पक्ष्यांचे थवेही नजरेत पडतात. धनेशसारखे पक्षी आसाम भागातून येतात. छोटे-मोठे स्थलांतरित पक्षी वड, पिंपळ, उंबर आणि इतर झाडांबरोबरच गावानजीक असलेल्या बागबगिच्यांमध्येही बागडताना आढळतात. पद्मपुष्प किंवा कस्तुर पक्षी इकडे-तिकडे उड्या मारत फिरत असतात.जास्त काळ उडता येत नसल्याने कस्तुर पक्षी थोडे अंतरच उडून जातात. बुलबुल, साळुंकी, चिमणी, चित्रांगण, सूर्यपक्षी, खंड्या, सुरेल दयाळ, पोपट आदी पक्षी तर खिडकीच्या तावदाने, काचांवर चोची मारून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत असतात.

अधूनमधून सुगरण, लाल मुनिया, गुलाबी पिंच, कालशीर्ष भारीट, पर्वत कलर, चिरक, दयाळ, छोटा सातभाई, नर्तक, कोतवाल, सुतार, बैरागी, शेंदरी विष्फुलिफ, जेरडीनचा क्लोरॉप्सिस, पिपिट, करडा धोबी, चेस्टनट पोटाचा नटहॅच, फुलटोच्या गप्पीदास, राखी वटवट्या, शिंपी, कस्तुर, टकाचोर, राखी खाटीक, छोटा हिरवा राघू, तांबट, तांबडा होला, हरतालिका, निलकंठ, नारद, भारद्वाज, ताम्रहंस आदी छोट्या-मोठ्या आकाराचे आकर्षक पक्षीही नजाकतीने खिडकीतून डोकावून पाहताना दिसतात. झाडे-झुडपे, बागबगीचे, गवताळ शेती, बांबूच्या वनात आकर्षक पाहुण्या पक्ष्यांची गर्दी वाढत आहे. अशा या खिडकीबाहेरच्या जगात स्वैर विहार करणार्‍या रंगीबिरंगी विविध जातीच्या आकर्षक पक्ष्यांच्या मनमोहक हालचालींनी मन आणि परिसरातील वातावरणही प्रफुल्लीत होते.

लॉकडाऊनदरम्यान जंगल, डोंगरकपारीत नागरिकांची वर्दळ कमी झाली. आसपासच्या कंपन्यांंची औद्योगिक घरघरही थंडावली. त्यामुळे पक्ष्यांना स्वैरपणे विहार करण्यासाठी आकाश मोकळे झाले आहे. त्यामुळे स्वैरपणे विहार करणारे पक्षी नागरी वस्तीतही आढळून येऊ लागले. जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळात अनेक झाडे जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे उंचावर राहणार्‍या अनेक पक्ष्यांची घरटीही उद्ध्वस्त झाली. पिल्लेही उघड्यावर आली आहेत. त्यामुळे विचलित व स्थलांतरित छोटे पक्षी नागरी वस्तीतील झाडाझुडुपांत दिसू लागले आहेत. किंगफिशरसारखे पक्षी जमिनीच्या बिळात घरटी बांधतात. असे पक्षी नागरी वस्तीत नेहमीच आढळतात.

-विवेक केणी, अध्यक्ष वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था, उरण

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply