Breaking News

भ्रष्टाचाराचा पराभव व सदाचाराचा विजय होणार -ना. अनंत गीते

पाली : रामप्रहर वृत्त

रायगड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही भ्रष्टाचाराच्या विरोधात सदाचाराची लढाई आहे. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही भ्रष्टाचाराचा पराभव होऊन सदाचाराचा विजय होणार, असा विश्वास शिवसेना-भाजप-रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे

उमेदवार आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी व्यक्त केला. ते शुक्रवारी (दि. 29) पाली येथील जाहीर सभेत बोलत होते.

या सभेस माजी मंत्री व भाजप नेते रविशेठ पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख किशोर जैन, भाजप-शिवसेना-रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. अनंत गीते सुनील तटकरेंचा समाचार घेताना म्हणाले की, आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते निवडणूक जाहीर होण्याच्या आधी जिल्हाभर पोस्टर लावून भाषण करीत होते आणि सांगत होते की, मी दाखवतो खासदार कसा असावा. आता मी सांगतो रायगडचा खासदार 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात नाव असणारा नसावा. हजारो शेतकर्‍यांच्या जमिनी कवडीमोलाने विकत घेणारा नसावा. मनी लाँडरिंगचा खटला सुरू असणारा नसावा. आपल्या सहकार्‍यांचा विश्वासघात करणारा नसावा, असे सांगून सिंचन घोटाळा झाला नसता व हे 70 हजार कोटी खरोखरंच सिंचनाच्या कामाला लागले असते, तर महाराष्ट्रातील एकाही शेतकर्‍याला आत्महत्या करावी लागली नसती. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचा शाप घोटाळेबाजांना लागल्याशिवाय राहणार नाही, असे गीते कडाडले.

– शेकापचे नाचता येईना अंगण वाकडे : रविशेठ जांभूळपाडा येथे प्रचार सभेत माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचा समाचार घेतला. ते म्हणाले, या मतदारसंघाला शेकापची कीड लागली आहे. रायगड जिल्हा परिषदेत भ्रष्टाचाराच्या पलीकडे शेकापचे दुसरे काम नाही. बरीच कामे ही भाजपच्या माध्यमातून झालीत. नाचता येईना अंगण वाकडे, या म्हणीप्रमाणे शेकापची गत झाली आहे. आपल्याला चांगला माणूस निवडून द्यायचा आहे. सहा वेळा खासदार, मंत्री होऊनही भ्रष्टाचाराचा डाग नसलेल्या अनंत गीते यांना विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply